कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखाण्याकडून आयोजित करण्यात येणारी मानधन धारक कुस्ती स्पर्धा गेल्या काही वर्षा पासुन बंद आहे. ही बंद पडलेली कुस्ती स्पर्धा सुरू व्हावी, वेळोवेळी कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळींना कुस्ती प्रेमींच्या वतीने निवेदने देण्यात आली. मात्र याकडे कानाडोळा करण्यात आला. कारखान्याने ही मानधन धारक कुस्ती स्पर्धा घ्यावी अन्यथा उपेषणाला बसणार असल्याचा इशारा कुस्ती हेच जीवन संघटनेचे संस्थापक पै.रामदास देसाई यांनी आज पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हणले आहे की, बिद्री साखर कारखान्यांने अनेक वर्षे मानधनधारक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून रांगड्या कुस्तीला चालना दिली. मात्र गेल्या काही वर्षांपासून कारखान्याच्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खंड पडला आहे. बिद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे इतर कारखाण्यापेक्षा मोठे आहे. चार ते पाच तालुके साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. यामुळे साखर कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेचा शेकडो गावातील कुस्तीगीरांना याचा फायदा होतो. तर राधानगरी व भुदरगड या दोन तालुक्यातील कुस्तीसाठी ही स्पर्धा वरदान ठरली होती. मात्र जेव्हापासून या स्पर्धेला खंड पडला तेव्हापासून या दोन तालुक्यातील कुस्ती चितपट झाली असून कुस्तीगीरांची संख्या झपाट्याने घटली आहे.
कोरोनाच्या काळात जत्रेयात्रेतील कुस्ती मैदाने बंद असल्यामुळे पैलवानांचा आर्थिक स्रोत बंद असल्यामुळे कारखाना क्षेत्रातील कुस्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा कठीण प्रसंगी कुस्ती जगवायची असेल तर बिद्री साखर कारखान्याच्या मानधानक कुस्ती सुरू होणे गरजेचे आहे. मात्र या मागणीला कारखान्याचे संचालक मंडळ जुमानत नसेल तर उपोषण करण्याशिवाय व कुस्ती क्षेत्राची ताकद दाखवण्याशिवाय पर्याय नसेल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुस्ती हेच जीवन महासंघ उपोषणाला बसणार असल्याची माहिती पै.रामदास देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
0 Comments