स्पर्धेच्या मुख्य सामन्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांतून खेळाडूंच्या कामगिरीची चाचपणी करणार आहे. भारतीय संघ आज इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे आणि कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० ऑक्टोबरला खेळणार आहे. या सामन्यात विराटनं मोठी घोषणा करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीला न खेळता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे जाहीर केले.
‘आयपीएल’द्वारे भारताचे सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने विराटसमोर फार अडचणी नसतील. हार्दिक पांड्याची तंदुरुस्ती हा विराटच्या डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. सलामीवीर म्हणून रोहित शर्मासह त्याच्यासह लोकेश राहुल उतरणार असल्याचे विराटनं आज स्पष्ट केले. २४ ऑक्टोबरला होणारा पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या सराव सामन्याद्वारे संघाचे योग्य संतुलन साधणे कोहलीचे मुख्य लक्ष्य असेल तसेच, अंतिम संघात ज्यांचे स्थान निश्चित नसेल, अशा खेळाडूंचा फॉर्म पाहण्याची संधीही सराव सामन्यांद्वारे मिळेल.
फिरकीपटूंमध्ये रवींद्र जडेजाचे स्थान निश्चित असून तंदुरुस्त राहिल्यास वरूण चक्रवर्तीलाही स्थान मिळेल. तिसरा फिरकीपटू म्हणून राहुल चहर आणि रवीचंद्रन अश्विन यांच्यात स्पर्धा असेल. वेगवान गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर मदार असून दोन फिरकी गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय झाल्यास वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर अंतिम संघात खेळू शकतो.
0 Comments