आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच काहीशी स्थिती आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुकवारी व्यक्त केले. एका ‘वेबपोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र; तसेच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेसची नेतेमंडळी राहुल गांधी विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असे सांगतात. यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.’ काँग्रेसबाबत विचारले असता त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे.
गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या; पण हवेली आहे, तशीच आहे. त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता १५-२० एकरवर आली आहे. सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवे पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरवे पीक माझे होते, असे सांगतो. माझे होते.
आता मात्र नाही.’ यावरच पवारांना म्हणजे काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का, असे विचारण्यात आले. तेव्हा पवार म्हणाले, ‘तितके काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती; पण ती होती. होती हे मान्य केले पाहिजे. मग विरोधी पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल.’
‘काँग्रेसची दुरवस्था झाली आहे हे खरे असले तरी त्या पक्षाला आजही देशात स्थान आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ होते. त्यामुळेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा प्रयोग झाला; पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेत,’ असेही पवार म्हणाले.
0 Comments