वैराग/प्रतिनिधी:
वैरागमधील विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका आणि वरिष्ठ लिपिक या दोघांनी संगनमत करीत आर्थिक लाभासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बनावट सह्यांच्या सहाय्याने संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याबाबतची फिर्याद संस्थेच्या अध्यक्षांनी वैराग पोलिसांत दिली आहे. याबाबत या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुख्याध्यापिका जिन्नत जहागीरदार या विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या २००९ ते २०१४ पर्यंत कार्यरत होत्या. याच दरम्यान विद्या मंदिर कन्या प्रशालेचे नंदकुमार धन्यकुमार रणदिवे हे २००५ पासून २०१७ पर्यंत वरिष्ठ लिपिक होते. जहागीरदार व रणदिवे यांनी पेन्शन प्रस्तावावर अध्यक्षाचा बनावट शिक्का मारून त्यावर संस्थेचे अध्यक्ष जयंत भूमकर यांच्या खोट्या सह्या केल्या. तसेच तारीख असलेले व नसलेले दोन कव्हरिंग लेटर लावलेले आहेत. त्या प्रस्तावावरील अध्यक्षांचा बनावट सही-शिक्का मारला आहे. तसेच जहागीरदार यांच्या सेवा पुस्तकांमधील रजेचा तपशील बनावट आहे.
लिपिक रणदिवे यांचा पुतण्या मनोज बाहुबली रणदिवे अर्धवेळ ग्रंथपाल असताना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्यासाठी नियमबाह्य प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संगनमत करून शासनाची व संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करत आहेत.
0 Comments