बार्शी/प्रतिनिधी:
उपळाई रस्त्यावरील नागरिकांसाठी पोलिस चौकीची सुविधा उपलब्ध करुन त्या भागातील नागरिकांना पोलिस संरक्षणाची व्यवस्था करावी अशी मागणी नगरसेवक मदनलाल गव्हाणे यांनी पोलिस अधिकक्षकांना लेखी पत्राद्वारे केली आहे. उपळाई रस्त्यावरील परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधांचे वातावरण आहे, शहरातील सुमारे पन्नास हजार लोकसंख्या या भागात वास्तव्यास आहे. सातत्याने होणाऱ्या छोट्यामोठ्या चोऱ्या, भांडणतंटे इत्यादी कारणांसाठी नागरिकांना पोलिसांच्या तातडीच्या मदतीची आवश्यकता भासते. शहर पोलिस ठाण्याचे अंतर हे तीन ते चार किलोमीटर अंतराचे असल्याने अडचणीचे ठरते.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या भागात पोलिस चौकी सुरु करावी असेही पत्रात म्हटले आहे. नगरपरिषदेच्या दिडशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या बार्शी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराचे विस्तारीकरणही होत आहे. शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या उपळाई रस्ता, परंडा रस्ता, गाडेगाव रस्ता, अलिपूर रस्ता, कांदलगाव रस्ता आदी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. शहरातील इंग्रजांच्या काळातही कार्यान्वित असलेल्या पोलिस चौक्यांची सेवा मधल्या काळात बंद झाल्याने नागरिकांची अडचण झाली. याबाबत अनेकांनी वेळोवेळी तक्रारी करुनही त्याची योग्य ती दखल घेतली गेली नाही. मध्यंतरी तुळशीराम रोड पोलिस चौकीच्या बांधकामाची दुरुस्ती करुन त्या ठिकाणी पोलिस सेवा सुरळीत करण्याच्या हालचाली वेगात सुरु झाल्या आहेत. पूर्वीच्या सर्व चौक्यांची सेवा सुरळीत करुन विस्तारीत भागातील नागरिकांसाठीही या सेवांची व्याप्ती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 Comments