शरद पवार यांच्या मनात काय शिजते आहे?; वादळापूर्वीची महाराष्ट्रात चलबिचल


कॉंग्रेसमधील अंतर्गत कुरबुरींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या नाराज आहेत. कॉंग्रेस दुखावली जाईल असे काहीही करणे ते टाळतात; पण वयाच्या या टप्प्यावर भाजपशी व्यवहार करायला ते मनातून तयार नसावेत, असे दिसते.

कॉंग्रेसमधील बंडखोर नेते (जी २३), पवार यांनी आपल्या गटाचे नेतृत्व करावे अशी गळ घालत आहेत. राज्याराज्यांतील कुरबुरी शांत करण्यात गांधी मंडळीना अपयश येत असल्याने कॉंग्रेस पक्ष फोडता आला तर पाहा, असाही एक मार्ग त्यात आहे. कारण कॉंग्रेस पक्षातले एकेक नेते भाजप किंवा अन्य प्रादेशिक पक्षात जात आहेत. अडचणींचा बोगदा संपतच नाही असे दिसत असेल, तर मग बंड करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. असे ‘जी २३’ नेत्यांना वाटते. २०२४ सालीही भाजपनेच सत्तेची खुर्ची पटकावली, तर त्यांच्यासाठी सारेच संपल्यागत होईल. पण, तरीही पवार या मंडळीना प्रोत्साहन देताना दिसत नाहीत.

सध्यातरी ते तिसऱ्या आघाडीच्या तुणतुण्यात आपला आवाज मिसळून आहेत. हरयाणाचे ओमप्रकाश चौताला नितीश कुमार यांच्याबरोबर बिगर कॉंग्रेस, बिगर भाजप आघाडीची मोट बांधण्याच्या उद्योगात आहेत. आपण भाजपसाठी यापुढे दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही, असे नितीश यांनी स्पष्ट करून टाकले असून, भाजपच्या आतले आणि बाहेरचे असंतुष्ट ते शोधत आहेत. निर्णय प्रक्रिया जलद व्हावी यासाठी निवडकांचा गट स्थापन करायची ममता बॅनर्जी यांची सूचना होती. कॉंग्रेसने त्याकडे लक्ष दिलेले नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते नाव उघड न करण्याच्या अटीवर प्रस्तुत लेखकाला सांगत होते, ‘खरेतर, आमचा पक्ष राहुल यांच्यामुळे प्रभावित आहे. सध्या कॉंग्रेस हम तो डुबेंगे सनम, लेकीन तुम्हे भी लेकर डुबेंगे’ अशा अवस्थेत आहे.’
– पवार त्यात कसे जातील?… त्यांच्या डोक्यात वेगळे काही तरी शिजते आहे.

वादळापूर्वीची महाराष्ट्रात चलबिचल

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली असली तरी महाराष्ट्रात काहीशी चलबिचल आणि वादळापूर्वीची वाटावी अशी शांतता आहे. खरेतर, या दोन्ही पक्षांना महाराष्ट्राबाहेर आघाडी नको आहे. मात्र सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या १९ पक्षांच्या बैठकीला या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले वेगळा सूर लावत असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला प्रतिसाद देऊ इच्छित नव्हते. आघाडी दुर्बल होईल असे वक्तव्य कोणत्याही कॉंग्रेस नेत्याने जाहीरपणे करू नये, अशी अट मग ठाकरे यांनी घातली.

कॉंग्रेसने २०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवायचे समजा ठरवलेले असले, तरी त्याचे नगारे आत्तापासून वाजवण्याची गरज नाही, असे शिवसेनेचे म्हणणे. राहुलशी अलीकडे संजय राऊत यांची घसट वाढली असल्याने गांधी मंडळींशी संवाद साधण्याची जबाबदारी राऊत यांच्यावर देण्यात आली. राहुल आणि राऊत या दोघांचे अलीकडे चांगलेच मेतकूट जमले आहे, असे म्हणतात. एकामागून एका राज्यात कॉंग्रेस पक्षातल्या कुरबुरी समोर येऊ लागल्याने आघाडीतल्या बिगर भाजप पक्षांमध्ये चलबिचल झाली. कॉंग्रेसबरोबर जलसमाधी घ्यायला कोणीच तयार नसल्याने जो तो आपापले पर्याय शोधू लागल्याचे दिसते.

अस्वस्थ प्रशांत किशोर

पक्ष प्रवेशाबद्दल कॉंग्रेस काहीच बोलायला तयार नसल्याने निवडणूक डावपेचकार प्रशांत किशोर सध्या शांत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी सुचवलेल्या योजनेवर कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्यांमध्ये चर्चा घडवून आणली गेली तेंव्हा मागच्या महिन्यात ते बरेच लगबगीत होते. पण, त्यांच्या डावपेचांचा चेंडू सध्या गांधी मंडळींच्या कोर्टात आहे. ‘पीके यांना कोणते पद द्यावे?’ या विचारात हे लोक मस्त वेळ घालवत बसलेले आहेत. उडी मारण्यापूर्वी पीके यांनी गांधींना काही अटी घातल्या. पण, गांधी निर्णय घ्यायलाच तयार नाहीत. प्रियांका भारतात परतल्या आहेत. त्यामुळे आता काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपबरोबर २०१४ साली हात पोळून घेतल्याने राष्ट्रीय पक्षांची दुखणी काय असतात हे पीके चांगले जाणून आहेत.

पंजाबमधील गोंधळ

सीमेवरचे संवेदनशील राज्य पंजाब सध्या खदखदते आहे. काही दशके सुप्तावस्थेत गेलेल्या राष्ट्रविरोधी शक्तींना डोके वर काढायला त्यामुळे वाव मिळेल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यांनी ‘आप’मध्ये घुसखोरी केली असून दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू यांनाही हे गट चुचकारत आहेत. पंजाब प्रदेश कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष ज्या प्रकारे बेदरकारपणे वागले ते पाहून कॉंग्रेस श्रेष्ठी धास्तावल्याचे कळते.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना वेसण घालण्यासाठी आणलेली कडवट सिद्धू गोळी गिळण्याची वेळ अखेर कॉंग्रेस श्रेष्ठींवरच आली आहे. काश्मीरमधले सर्व धोके जीवंत असताना आणखी एका सीमावर्ती राज्यात अशांतता माजू देणे देशाला आणि अर्थातच केंद्र सरकारला परवडणारे नाही. निराश झालेले अमरिंदर अलीकडेच पंतप्रधानाना भेटले. २०१७ सालापासून ४७ पाकिस्तानी दहशतवादी गट आणि ३४७ गुंडांच्या टोळ्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली, असे कळते.

Post a Comment

0 Comments