"आमदार आपल्या दारी" उपक्रमांतर्गत आमदार राजेंद्र राऊत यांनी केले शहरातील विविध विकास कामांची पाहणी



बार्शी/प्रतिनिधी:

मागील काही महिन्यांपासून बार्शी शहरामध्ये आमदार आपल्या दारी अभियानांतर्गत आमदार राजाभाऊ राऊत शहराच्या विविध भागात भेटी देऊन नागरिकांच्या समस्या, अडी-अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  त्या अडीअडचणी, समस्या जाणून घेताना त्यांच्याशी होत असलेल्या संवादातून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे. 

शहरातील नागरिकांसाठी प्राथमिक गरजा, त्यांच्या आरोग्याची काळजी, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, त्याचप्रमाणे शहरातील होतकरू सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग-व्यवसायासाठी व्यापारी गाळ्यांचे निर्माण, अबालवृद्ध बाळ-गोपाळ व कुटुंबासाठी प्रसन्न वातावरणातील विरंगुळा घालवण्यासाठी बाग-बगीच्यांचे निर्माण, गोरगरीबांसाठी घरकुले आदी प्रकारची विकास कामे अनेक योजनांच्या माध्यमातून बार्शी शहरात सातत्याने सुरू आहेत. यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी या कामांवर प्रत्यक्ष भेटी देऊन, त्या कामाची प्रगती व दर्जाची पाहणी केली. विकास कामे करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, नागरिकांकरीता ही कामे लवकरात लवकर उपयोगात आणून लोकार्पण करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

यादृष्टीने आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी शहरातील ताडसौंदणे रोड येथील पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी करून ती लवकरात लवकर उपयोगात आणण्यासाठी सूचना दिल्या. 

सुभाष नगर परिसरातील गणेश तलाव सुशोभीकरण कामाची पाहणी करून लवकरात लवकर नागरीकांसाठी ते खुले करण्यासाठी सांगितले. 

भवानी पेठ येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या मटन मच्छी मार्केटच्या कामाची पाहणी केली. यानंतर भवानी पेठ येथे बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाची पाहणी करून त्याचा आढावा घेतला. 

त्याचबरोबर सोलापूर रोड येथील राणी लक्ष्मीबाई उद्यान सुशोभीकरण कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. 

भगवंत मैदानाच्या नूतनीकरणाच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी करून, लक्ष्मीतीर्थ बाजूस भेळपुरी व्यायसियांकासाठी  नवीन बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलास भेट दिली. 

त्याचबरोबर चांदणी जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन, तेथील कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
 
यावेळी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ अमिता दगडे पाटील मॅडम,नगर अभियंता भारत विधाते, जलदाय अभियंता अजय होनखांबे, महादेव बोकेफोडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments