राज्यातील दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी होणारी सामाईक प्रवेश परीक्षा, अर्थात ‘सीईटी’ (CET) रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आज हा महत्वपूर्ण निकाल दिला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या १६ जुलै रोजी दहावीचा निकाल मूल्यांकन पद्धतीनुसार जाहीर केला. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. तसे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.
राज्य सरकारने ही प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एक ‘पोर्टल’ तयार केले होते. ‘सीईटी’साठी अर्ज करण्याची मुदत २ ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील तब्बल १२ लाख विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’साठी नोंदणी केली होती. राज्य सरकारने २१ ऑगस्ट रोजी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेणार असल्याचे सांगितले होते.
परीक्षा जाहीर होताच, विद्यार्थी अभ्यासालाही लागले. मात्र, परीक्षा तोंडावर आलेली असतानाच मुंबई हायकोर्टाने ‘सीईटी’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा दणका आहे.
अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २ ऑगस्ट रोजी संपली, तर ‘सीबीएसई’ बोर्डाचा दहावीचा निकाल ३ ऑगस्टला जाहीर झाला. त्यामुळे ‘सीबीएसई’ शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली होती.
तसेच, ‘सीईटी’ परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे ‘आयसीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांचीही अडचण झाली होती. ‘आयसीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम माहित नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता होती.
0 Comments