विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रण दिले आहे. त्यानुसार पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी माहिती दिली. आमच्या भेटीनंतर आमदार नियुक्तीचा निर्णय मार्गी लागेल किं वा कसे, याबाबत सांगता येणार नाही. कारण हा विषय सर्वस्वी राज्यपालांच्या अखत्यारितील आहे, मंत्रिमंडळ केवळ शिफारस करू शकते, असेही पवार यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ात राज्यपाल कोश्यारी यांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर करोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘लोकायुक्तांना शपथ देण्याच्या कार्यक्रमात माझ्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्य सचिव यांची राज्यपाल कोश्यारी यांच्याशी भेट झाली. या कार्यक्रमानंतर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत आम्ही विषय काढला. त्यावर या विषयाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही भेटीला या, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. ’
0 Comments