पुणे :
जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला एजंटने स्वत: जिल्हाधिकारी व तहसिलदार असल्याचे सांगत अनेकांना लाखोचा गंडा घातला आहे. तिचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतही वावर असल्याने तेथेही महिलेने काही जणांना गंडा घातल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर महिलेविरुध्द आजपर्यंत पाच ते सहा जणांनी तक्रार केल्या असून तिने आतापर्यंत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अनिता भिसे या महिलेला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात चित्तर दाम्पत्य येरवडा परिसरातील प्रतिकनगर येथील उत्तम टाऊन स्केप सोसायटीत राहतात. त्यांच्या सोसायटीत भाड्याने राहणार्या अनिता भिसे या महिलेने अपंगांसाठी शासकीय भुखंड मिळवुन देण्याचे आमिष दाखवले होते.
त्यासाठी चित्तर दाम्पत्याकडून तिने २७ लाख ५० हजार रूपये घेतले होते. मात्र, भूखंड न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुर्गेश्वरी चित्तर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले.
पोलिसांनी अनिता भिसे हिच्या घराची झडती घेतली असता त्यांना बनावट शिक्के, बनावट कागदपत्र तसेच काही लोकांना नोकरीस लावण्याकरिता तयार केलेले बनावट कागदपत्र सापडले.
चित्तर दाम्पत्याप्रमाणे अजूनही ५-६ जणांनी अनिताविरोधात तक्रार दिली असून तिने आतापर्यंत ५०-६० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले आहे. ज्यांची फसवणुक झाली असेल त्यांनी येरवडा पोलीस स्थानकात येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पकंज देशमुख , सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, उप-निरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, गणेश वाघ, विठ्ठल खेडकर, पार्वती भंडारी, राजेंद्र ढोणे, वर्षा सावंत यांनी केली.
0 Comments