पुण्यातील (Pune) एका महिला पदाधिकाऱ्याला सतत मोबाइलवर मेसेज पाठवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं एका तरुणाला चांगलंच भोवलं आहे.
याप्रकरणी पुण्यातील काही जणांनी धुळ्यात जाऊन तरुणाला बेदम मारहाण केली आहे. शिवाय त्याचे हातपाय बांधून त्याला गाडीत टाकून नाशकात आणलं आहे.
यानंतर आरोपींनी संबंधित तरुणाला नाशकातील पंचवटी याठिकाणी आणून एका सलूनमध्ये त्याचं मुंडण केलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणानं पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून गुन्ह्यात वापरलेली चारचाकीही जप्त केली आहे.
संबंधित मारहाण झालेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव विलास चव्हाण असून तो धुळ्यातील रहिवासी आहे. तो मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका महिला पदाधिकाऱ्याला सतत मेजेस करत होता. तिच्याशी संवाद साधून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे पुण्यातील काहीजणांनी धुळ्यात जाऊन संबंधित तरुणाला चोप दिला आहे.
सोनाली निंबाळकर (स्ट्रीट कॅम्प, पुणे) जयसिंगकौर तेजिंदर सिंग छाबडा, निलेश सुरेश जाधव (लक्ष्मीनगर, पुणे), राहुल निंबाळकर (हॅपी कॉलनी, पुणे) आणि सागर शिवाजी गायकवाड असं अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं असून त्यांची चौकशी केली जात आहे. संबंधित आरोपींनी पुण्यातून धुळ्याला जात संबंधित तरुणाला मारहाण केली आहे.
आरोपींनी पीडित तरुणाला घरातून बाहेर बोलावून मोटारीत डांबलं आणि बेदम मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित तरुणाचे हातपाय बांधून त्याला थेट नाशिक येथील पंचवटी भागात आणलं.
पंचवटी भागातील फुलेनगर परिसरातील एका सलूनमध्ये आणून त्याचं मुंडणही केलं. याप्रकरणी तरुणानं पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपींच्या चारचाकीची नाकेबंदी करत अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
0 Comments