दानिश सिद्दीकी : फोटो पत्रकारीतेच्या दुनियेतील चमकता तारा


✍🏻  कू. शर्वरी रविंद्र मधाळे
         
'दानिश सिद्दीकी ' नावाचा एक तरुण मास कम्युनिकेशन कोर्स करून वृत्तवाहिनी बातमीदार म्हणून नावारूपाला आला. पण त्याला असणारा फोटोग्राफीचा छंद त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.  नुसते फोटो टिपणे नाही तर समाजातील वास्तव सर्वांपुढे आणणे हा त्यांचा मूळ उद्देश होता.  बातमीदारी करताना त्यांनी टीपलेले फोटो केवळ एक हजार नव्हे तर एक लाख शब्द बोलत असत.  

नेहमीच सत्याचा शोध घेण्याची वृत्ती आणि फोटोग्राफीचा छंद यामुळे त्यांनी पुढे वृत्तछायाचित्रकार होण्याचा ध्यास घेतला.रॉयटस् या नामांकित वृत्तसंस्थेमध्ये त्यांची निवड झाली.वास्तव टिपण्याचा आणि चित्तथरारक घटनांना मूर्तरूप देण्याचा प्रवास अधिक वेगाने सुरू झाला. प्रवाहाविरुद्ध पोहताना त्यांनी अनेक घटना जशाच्या तशा कॅमेराबद्ध केल्या आहेत. निरीक्षणशक्ती खुप सखोल असल्याने त्यांच्या प्रत्येक फोटोत एक 'स्टोरी' दडलेली असे. यासाठी त्यांना लित्झर पुरस्कार देखील मिळाला आहे. मागील दीड वर्षामध्ये देशातील महत्वपूर्ण घटनांच्या कव्हरेजमध्ये त्यांनी केलेली फोटोग्राफी नेहमीच दोन पावले पुढे होती. 

दिल्लीत झालेल्या दंगलीवेळी एका व्यक्तीस जमावाकडून होणारी मारहाण दानेशयांनी धाडसाने टिपली या फोटोतून दिल्ली दंगलीची भीषणता सर्वासमोर आणली. जगभर असणारे कोरोना महामारीचे विचित्र सावट व मन  हेलावून टाकणारे क्षण त्यांनी कॅमेराबध्द केले आहेत. ज्याला कारोना झालंय तो शरीराने, नझालेला मनाने संपतो हे जळजळीत सत्य दानिशयांनी बिहारमधील एका हॉस्पिटलमध्ये टीपलेल्या छायाचित्रातून जगाला सांगितले. कोरोना महामारीतील त्यांनी टिपलेला प्रत्येक फोटो व्यवस्था आणि भयावह परिस्थितीवर अचूक भाष्य करणारा होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो रुग्ण जगण्याची लढाई हारले. दिल्लीतील स्मशानभूमीत मृतदेहांचे खच जमले होते. त्यावेळी दानेश यांनी काढलेल्या 'पेटत्या चिता ' या फोटोने भारतातील कोरोनाची दाहकता व भायावहता जगासमोर आणली. 
       
पुढे ११ जुलै रोजी दानिश आपल्या कामासाठी  अफगाणीस्तानला पोहचले. ते निर्भिडपणे युद्धभूमीवर आपले कर्तव्य बजावत होते. अगाणिस्तानचे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची चकमक सुरू असताना लागलेल्या गोळीत त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. त्यांचा फोटोपत्रकारीतेचा हा चित्तथरारक  प्रवास आचानक संपेल असं स्वप्नातही वाटलं नाही. त्यांच्या आकस्मित निधनाने फोटोजर्नालिझम विश्वात कधीही नभरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दानिश सिद्दीकी हे आपल्यात कार्यरुपी नसले तरी त्यांचे फोटो वास्तवाची भाषा बोलत राहतील. त्यांचे फोटो पुढील कित्येक पिढ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत राहतील.

            
( लेखिका ग.गो.जाधव अध्यासन केंद्र,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत)

Post a Comment

0 Comments