कोल्हापूर/समाधान जाधव:
रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये इतिहास विभागाचा ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ या विषयावर गुरुवार,दिनांक ०८/०७/२०२१ रोजी राष्ट्रीय वेबिनार संपन्न झाला. या राष्ट्रीय वेबिनार मधील प्रथम सत्राचे साधन व्यक्ती रबी रंजन सेन, कटवा कॉलेज, पश्चिम बंगाल व दुसऱ्या सत्राचे चे साधन व्यक्ती श्रीकांत शिरसाठे, एस. एच. केळकर कॉलेज, देवगड यांचे स्वागत राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.टी.साळुंखे यांनी केले. या इतिहास विभागाच्या राष्ट्रीय वेबिनार चे अध्यक्षस्थान इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस. एम. साठे यांनी भूषवले. रवी रंजन सेन यांची व ,दुसऱ्या सत्राचे साधन व्यक्ती श्रीकांत शिरसाठे मुंबई विद्यापीठातील शाहू अध्यासन केंद्राचे समन्वयक,व इतिहास विभाग प्रमुख एस.एच. केळकर कॉलेज, देवगड,यांची ओळख शाहू कॉलेज चे इतिहास विभाग प्रमुख, डॉ.व्ही.व्ही पाडळकर यांनी करून दिली.
प्रथम सत्रात आपल्या “शाहू महाराजांच्या कार्याचा तत्कालीन प्रभाव”या विषयाची मांडणी करत असताना रबी रंजन सेन यानी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वांगीण कार्याचा समर्पक आढावा घेतला. तत्कालीन कालखंडात पूर्ण हिंदुस्तानात त्यांच्या कार्याचा पडलेला प्रभाव त्यांनी विशद केला. तत्कालीन कालखंडामध्ये सामाजिक व्यवस्था आणि या सामाजिक व्यवस्थेमध्ये असणारा ब्राह्मणवाद याविरोधात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अँटी ब्राह्मण व्यवस्था निर्मित केली. आर्य समाजाच्या कार्यसही त्यांनी हातभार लावला.यज्ञोपवीत सर्वसामान्य देखील घालू शकतात यासंदर्भात त्यांनी उद्बोधन केले.सर्व जाती-जमातींना वेद वाचण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांनी वेदशाळा स्थापन केली. ब्राह्मणांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी क्षत्रिय जगद्गुरु पीठ त्यांनी निर्माण केले. त्यांच्या या कार्यातून असे स्पष्टपणे दिसून येते की जातिव्यवस्थेचा असणारा विशिष्ट दृष्टिकोन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बदलला.त्यांनी सर्वसामान्य आणि दलित कुटुंबातील व्यक्तींना शिष्यवृत्ती व फ्री-शिप देऊन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पुढे आणले. १९१२ नंतर गावातील जे पाटील अशिक्षित होते अशा पाटलांसाठी गाव कारभार करताना साह्य व्हावे हिशोब-किताब, न्यायसूत्र, प्रशासन,विधी या संदर्भामध्ये ज्ञान व्हावे म्हणून ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली. कायदे, प्रशासन, कायद्याची निर्मिती, अंमलबजावणी या संदर्भामध्ये त्यांनी करवीर संस्थानात वेगळी अशी भूमिका घेतली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्य वरून ते प्रभावित झाले होते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शाळा, हॉस्पिटल इत्यादींची निर्मिती केली. अंतरजातीय विवाह हे कायदेशीर आहेत असे त्यांनी संस्थानात घोषित केले. भारतामध्ये अनेक संस्थाने असताना विधवा विवाहाला मान्यता देणारा,दासी प्रथा बंद करणारा, स्त्रियांवरील होणारे अन्याय-अत्याचार दूर करणारा असा हा न्यायी राजा होता. त्यांनी जात निहाय हॉस्टेलची निर्मिती करू शिक्षणास चालना दिली. १९०१ ला आरक्षणाचा कायदा करून सर्वसामान्यांना देखील संधी त्यांनी निर्माण करून शिक्षित ब्राह्मणांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी बहुजन वर्गाला त्यांनी शिक्षित करण्याचा अतोनात प्रयत्न केला.
शाहू मिल, शेतकरी कृषी बाजार,शाहूपुरी व्यापारी पेठ,शेतीचे आधुनिकीकरण यासाठी त्यांनी प्रयत्न केले. किंग एडवर्ड यांच्या नावाने त्यांनी शेती संस्थांची निर्मिती केली.शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी राधानगरी धरणाची निर्मिती केली. संगीत,साहित्य, संस्कृती या समग्र क्षेत्रांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. बालगंधर्व यांना कानाच्या ट्रीटमेंटसाठी आर्थिक त्यांनी मदत केली. मल्लविद्येचे खास शौकीन असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भारतातील अनेक मल्लांना राजाश्रय दिला आणि मल्लविद्येसाठी खासबाग मैदान बांधून घेतले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी भारतात दोनच ठिकाणी असणारा साहसी खेळ साठमारी हा देखील कोल्हापुरात निर्मित केला. त्या कालखंडामध्ये संपूर्ण हिंदुस्थानात चाललेल्या समाज सुधारणांचे परिपूर्ण नियोजन शाहू महाराजांनी त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्यात केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी मदत केली होती. अस्पृश्यता, वर्णव्यवस्था आणि दलित उद्धारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या कार्याचा गौरव राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केला होता. मूकनायक या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पत्रास त्यांनी मदत केली होती. १९२० साली भरलेल्या माणगाव परिषदेमध्ये मध्ये त्यांनी दलितांच्या उद्धारासाठी आग्रही भूमिका घेतली होती. या उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने रबी रंजन सेन या यांनी विवेचन केले.
दुसऱ्या सत्राचे साधन व्यक्ती श्रीकांत शिरसाठे,मुंबई विद्यापीठातील शाहू अध्यासन केंद्राचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख एस.एच. केळकर कॉलेज, देवगड,यांनी “राजर्षी छत्रपती शाहू महाराज व आरक्षण” या विषयाची मांडणी केली. सुरुवातीच्या विवेचाना मध्ये त्यांनी असे सांगितले की सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी प्राथमिक शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी सक्तीची केली. जातवार वसतिगृहांची निर्मिती करून असणाऱ्या प्राप्त परिस्थितीत देखील त्यांनी शिक्षणाची व्यवस्था पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले. याच वस्तीगृहात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जैन बोर्डिंग मध्ये राहून शिक्षण घेतले होते असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर कर्मवीरांच्या व्यक्तिमत्वावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव पडला होता असे देखील त्यांनी सांगितले. प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आरक्षणाचे धोरण होते.करवीर संस्थानात आरक्षणाचे धोरण त्यांनी २६ जुलै १९०२ ला आरक्षणाचा जाहीरनामा जाहीर करून ५० टक्के आरक्षण पहिल्यांदा देशभरामध्ये लागू केले होते. म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असे म्हटले जाते. आरक्षणाचे जनक असे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना असे उद्बोधकन करत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे धोरण का स्वीकारले, प्रत्यक्षात आरक्षण जाहीर केल्यानंतर कोणकोणत्या अडचणींना आणि बदनामीला सामोरे जावे लागले आणि आरक्षण धोरणाचे परिणाम सांगून त्यांनी दुसऱ्या सत्रात त्यांच्या आरक्षण कार्याचा समग्र घेतला. राजदंड हा लोक कल्याणाकरता असतो हे पहिल्यांदा शाहू महाराज यांनी दाखवून दिले. वर्चस्ववादातून मुक्तता करून शाहू महाराजांना व्यवस्थाही परिवर्तीत करायची होती.त्यासाठी त्यांनी आरक्षण लागू केले होते. या दृष्टिकोनातून समग्रपणे त्यांनी विवेचन केले. समाज हा प्रवाहित झाला पाहिजे आणि सर्व लोक समान असले पाहिजेत या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न होते.वेदोक्त प्रकरणा मुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जाती निर्मूलनाचे कार्य अधिकच प्रखर झाले.म्हणून २६ जुलै १९०२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण धोरण जाहीर केले.तत्कालीन प्रतिक्रिया सांगताना साधनव्यक्ती असे म्हणाले की, केसरी व मराठा मधून लोकमान्य टिळकांनी शाहूंच्या धोरणावर कडवट टीका केली होती. ५६७संस्थांपैकी कोणत्याही राजाने शाहू महाराजां सारखा विचार केलेला नव्हता. प्रसिद्ध चरित्रकार धनंजय किर असे म्हणतात कि “नव्या युगाची घोषणा करणारे अग्रदूत हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते” असे त्यांनी सांगितले. शोषणातून मुक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षणातून समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. यामुळेच ब्राह्मणेतर मंडळी करवीर संस्थानामध्ये पुढे येऊ लागली. ब्राह्मणेतर मंडळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रशासनात सामील होऊ लागली. याचे श्रेय शाहू महाराजांना जातं कारण त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था हे हिंदुस्थानातल्या इतर कोणत्याही संस्थांना झाली नव्हती.त्यांनी राजवाड्यात अस्पृश्यांना आमंत्रित केले व प्रचलित पद्धती तो मोडून काढल्या.समाजात माणूस म्हणून जगण्याचे बळ देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कार्य केले. नंतरच्या कालखंडामध्ये शाहू महाराजांच्या आरक्षण चळवळीला गती देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असे विचार द्वितीय सत्राच्या साधन व्यक्ती विक्रांत शिरसाठे यांनी व्यक्त केले.
या राष्ट्रीय वेबीनारचे अध्यक्ष आर्ट विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.एस.एम.साठे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वसमावेशक शाहू विचार सांगितले. महाराष्ट्रात दोनच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज हेच दिन-दलितांचे उध्दारकर्ते होते असे त्यांनी सांगितले.सत्यशोधक समाज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी मदत केल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्याबरोबरच बडोद्याचे सयाजीराव महाराज यांचे कार्य ही महत्त्वाचे होते असे त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या संदर्भामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी वकील अभ्यंकर यांच्यासमोर प्रस्तुत केलेले उदाहरण त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
गूगल मीठ प्लॅटफॉर्मवर झालेल्या या राष्ट्रीय वेबिनार मध्ये देशभरातून ३५० हून अधिक सहभागीनी उपस्थिती नोंदविली. या वेबिणार वेबिनारसाठी तंत्रसाहाय्य श्री अनिकेत जाधव यांचे लाभले.या राष्ट्रीय वेबिनार चे सूत्रसंचालन शामल मुरकर मॅडम, इंग्रजी विभाग यांनी केले. या राष्ट्रीय वेबिनार आभार प्रा.समाधान जाधव यांनी केले.
0 Comments