पंढरपूर/प्रतिनिधी:
वारकऱ्यांच्या आराध्य दैवत असणार्या सावळ्या विठूरायाची आषाढी एकादशी सोहळा २० जुलैला होणार आहे. या एकादशी सोहळ्याची तयारी विठ्ठल मंदिर समितीकडून पूर्ण झाली आहे. यामध्ये मंदिरातील सोळखांबी, सभा मंडप, विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभारा कर्मचाऱ्यांकडून चकाचक करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची तयारी करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून योग्य ती दक्षता
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पांडुरंगाची आषाढी एकादशी प्रातिनिधिक स्वरूपाचा होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून मंदिरातील स्वच्छतेची योग्य ती दक्षता घेताना दिसत आहे दिवसभरातून मंदिरातील कर्मचारी हे तीन वेळा मंदिर स्वच्छ करतात. यामध्ये सॅनिटायझरची फवारणी असेल. सफाई असेल यावर मंदिराकडून भर दिला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीच्या उजळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी १२ कर्मचारी काम करत आहेत.
मंदिर प्रशासनाकडून मानाच्या पालख्यांमधील वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था..
राज्य सरकारकडून संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या सह दहा मानाच्या पालख्यांना एकादशी दिवशी पंढरपुरात येण्याची परवानगी दिली आहे. १९ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास एसटी च्या माध्यमातून या पालख्या वाखरीत तळावर येणार आहे त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही केली असल्याची माहिती विठ्ठल जोशी यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करणार..
आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते. २० जुलै रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत श्रीच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल मंदिरातील वीणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई केशव कोलते (वय ६६, रा. संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिर पाठीमागे, वर्धा) यांना मिळणार आहे.
0 Comments