बार्शी : जवळगाव येथील मध्यम प्रकल्पात पाणी आता बंदिस्त जलवाहिनीद्वारे येणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शिवाय जलसंपदा विभागाने यासंबंधी अहवाल तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तालुक्यातील जवळगाव येथे १.२२ टीएमसीचा मध्यम प्रकल्प १९७५ साली उभारण्यात आला होता. यामध्ये ५.७३ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा तर २१.१८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. या कालव्याच्या माध्यमातून ३५६० हेक्टरावरील जमिनीला पाणी मिळावे असे धोरण आखण्यात आले होते. मात्र, अधिकतर पाण्याचा अपव्यय हा जलवाहिनीद्वारे होत असतो. जागोजागी गळती आणि जमिनीला पडलेल्या भेगा यामुळे केवळ ५०० हेक्टरवरील क्षेत्रालाच याच लाभ झालेला आहे. अनेक वेळा दुरुस्ती कामेही होऊन हीच अवस्था असल्याने राजेंद्र मिरगणे व माजी मंत्री यांनी कालव्यात येणारे पाणी हे बंदिस्त जलवाहिनद्वारे येण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. अखेर या संदर्भात आता अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वेळप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुधाकर कापसे, नाना पाटील तसेच वैराग विभागातील शेतकरी उपस्थित होते.
अपव्यय टळणार अन साठवण क्षमताही वाढणार
जवळगाव मध्यम प्रकल्प हा वैराग भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मात्र, सध्या जागोजागी गळती असल्याने हा कालवा पूर्ण क्षमतेने भरत नाही. शिवाय पाण्याचा अपव्यय होत आहे. बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी कालव्यात आले तर या भागातील १२५० अतिरिक्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
1 Comments
मिरगणे साहेब म्हणजे जनतेचे खरे जननायक,वैराग भागातील जनता आभारी आहे साहेब आपले।।
ReplyDelete