✒️ कू. शर्वरी रविंद्र मधाळे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
न आठवीता ही ज्या गोष्टी आपसूक आठवतात, कदाचित त्यांनाच ' आठवणी ' म्हणतात. थोड भूतकाळात डोकावल की आठवणीनरुपी पक्षांचा थवा आसमंतात मुक्त विहार करतो. या आठवणी आपल्याला क्षणकाल तिथेच थांबून ठेवतात, त्यांना काळ - वेळ कशाचंच भान नसतं. आठवणींना हाक मारताच त्या एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे पळत येतात. कायम सख्यासोबती असतात, यांच्या मुळे कित्येक क्षण पुन्हा जगता येतात. माणसं ही आठवणींवरच तर जगतात मुळी.
कोणाला कधी, कुठे आणि काय आठवेल हे सांगता येणं कठीण? नऊ महिने वाट पाहून आपल्या बाळाला हातात घेणाऱ्या आईच्या आठवणी किती निरागस असतील नाही, सतत अपयश येऊन देखील शेवटच्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याच्या आठवणी किती सुखद असतील. सुखी संसाराची स्वप्ने रंगविनाऱ्या नवविवाहितेच्या आठवणी कशा मोहक असतात. या आणि अशा बऱ्याच आठवणी प्रत्येकाने साठवून ठेवलेल्या असतात.
सगळ्याच आठवणी भरजरी नसतात. अनेकदा त्या सध्याचं असतात. पण काही आठवणी सुखद नसतात मनाचा तळ ढवळनाऱ्या आणि जखमेवरच्या खपल्या कढणाऱ्याही असतात. अशा नको वाटणाऱ्या आठवणी सोबत दुःख आणि यातना पण घेऊन येतात. रस्त्यात एखादा गरीब बाप दिसला तर त्याच्या थकलेल्या डोळ्यात त्याच्या तरुण मुलाच्या आठवणी दिसतात. कधी कपाळावर कुंकू नसलेली स्त्री दिसली तर तिच्या आठवणीत तिचा नवरा दिसतो. अनाथ वृद्ध आई - वडील दिसले की त्यांची सोडून गेलेली मुले आठवतात, धायमोकलून रडणाऱ्या मातेकडे पाहिलं की नुकताच शहीद झालेला तिचा पुत्र दिसतो. गर्दीत हरवलेली छोटी मुलगी असेल तर तिला तिचे आई बाबा आठवतात. खुप दिवस गंभीर आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णाला विचारा घरची आठवण काय असते.
तर असे कित्येक लोक आणि त्यांच्या कित्येक आठवणी. काळच चक्र कितीही पुढं गेलं तरी जुन्या आठवणी कायमच्या मनात जिवंत असतात. ' ओंजळीतून पाणी निघून गेलं तरी त्याचा थंडगार ओलावा तळहातावर तसाच असतो. ' एखाद्या शांत ठिकाणी जाऊन आयुष्यातील सुखद आठवणींचा पट पाहण्यात ही वेगळीच गंमत असते. काही नकोश्या वाटणाऱ्या आठवणी कधी कधी डोईजड होऊ लागतात. त्यावेळी कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं. पाण्याने भरलेली डोक्यावरची घागर ओतून दिल्यानंतर जस मोकळं होत ना, अगदी तसच वाटत.. तसा या आठवणींमध्ये किती विरोधाभास आहे. शेवटी आपल्यावर अवलंबून आहे, कुठल्या आठवणी आठवयाच्या आणि कूठल्या नाही..!
0 Comments