मध्यप्रदेश:
देशात करोना लसीच्या तुटवड्यावरून रणकंदन सुरू आहे. लस उपलब्ध नसल्याने अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पुढे ढकललं आहे. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात लसीकरण केंद्र लसीअभावी बंद ठेवले जात आहेत. असं असताना कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४० हजार डोस असलेला एक कंटनेर बेवारस अवस्थेत आढळला आहे. मध्य प्रदेशात हा प्रकार समोर आला आहे. रस्त्याकडेला कंटेनर उभा होता, तर ड्रायव्हर आणि क्लिनर ठिकाणावरून बेपत्ता होते.
मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली बस स्थानकाजवळ लसींची वाहतूक कंटनेर उभा असलेला आढळून आला. बराच वेळ झाला तरी कंटेनर उभा असल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती करेली पोलिसांना दिली. कंटेनर रस्त्याकडेला उभा असून, ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर जागेवर नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरच्या ठिकाणी पोलीस पोहोचले. त्यानंतर कंटेनरची पाहणी केली. त्यावेळी त्यांना कंटेनरमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४० हजार डोस असल्याचं आढळून आलं. लसीच्या या डोसची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये इतकी आहे.
“कंटेनरमध्ये २ लाख ४० हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस आहेत. त्याची अंदाजित किंमत ८ कोटी इतकी आहे. पोलिसांनी ड्रायव्हरचा शोध घेण्यास सुरूवात केली. जेव्हा त्याच्या फोनचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा फोन महामार्गालगत असलेल्या झाडाझुडपात सापडला. कंटेनर वातानुकूलित असल्याने आतील लसी सुरक्षित आहेत. पोलीस सध्या ड्रायव्हर आणि क्लिनरचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांचा ठावठिकाणा सापडत नाहीये,” अशी माहिती करेली पोलीस ठाण्याच पोलीस उपनिरीक्षक आशिष बोपाचे यांनी दिली.
0 Comments