कोरोना रोखण्यासाठी अहिल्याबाईंच्या पुतळ्याची पूजा करणाऱ्या मंत्र्यांनी तिसरी लाट रोखण्यासाठी दिला अजब सल्ला


कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी डॉक्टर, शास्त्रज्ञ हे जीव ओतून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नवनवीन औषधे लसी यांचा शोध लावला जात आहे. मात्र दुसरीकडं काही नेते काही विचित्र सल्ले देतानाही दिसत आहेत. नेहमी अशाच वक्तव्यांसाठी चर्चेत राहणाऱ्या मध्य प्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर  यांनी आणखी एक असाच सल्ला दिला आहे. सर्वांनी सकाळी १० वाजता यज्ञ केल्यास कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.संपूर्ण देशासह मध्य प्रदेशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यासह सगळेच रात्रंदिवस याचा निपटारा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नेत्यांच्या वक्तव्यांनी शिवराज सिंह यांची डोकेदुखी वाढवली आहे. मध्य प्रदेश सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करत असतानाच त्यांच्याच मंत्री उषा ठाकूर यांच्या एका वक्तव्याची चर्चा सुरू आहे.


राज्याच्या पर्यटन आणि सास्कृतिक मंत्री उषा ठाकुर म्हणाल्या की, देशामध्ये कोरोना व्हायरसची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी यज्ञ करायला हवा. ही भारताची सनातन परंपरा असल्याचं सांगत ठाकूर यांनी यज्ञ करण्यासाठी ठरावीक वेळही सांगितली आहे. उषा ठाकूर म्हणाल्या की, यज्ञ केल्यास कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकणार नाही. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, सरकार तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाटी सर्व प्रयत्न करत आहे. 

त्याद्वारे आपण या महामारीवर वियंत्रण मिळवू. पण त्याचवेळी त्या म्हणाल्या की. सर्वांनी पर्यावरण शुद्ध करण्यासाठी यज्ञ करावा आणि दोन-दोन आहुती द्याव्या. १०, ११,१२  आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करवा असं त्यांनी सांगितलं. यज्ञ ही चिकित्सा आहे, कर्मकांड किंवा अंधविश्वास नाही. पर्यावरण शुद्ध करण्याची ही पद्धत असल्याचं त्या म्हणाल्या.

याआधीही उषा ठाकूर यांनी विमानतळावर कोरोनाचा प्रताप कमी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची पुजा करत प्रार्थनाही केली होती. त्यावेळी याबाबत प्रचंड चर्चा झाली होती.कोरोनासंदर्भात मंत्री उषा ठाकूर यांचं वक्तव्य पहिल्यांदाच आलेलं नाही. यापूर्वीही त्यांनी मास्कबाबत विचित्र वक्तव्य केलं होतं. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मास्क परिधान करण्याच्या सरकारी अभियानात त्यांनी मास्क परिधान केले नाही. त्यावर माध्यमांनी प्रश्न विचारले असता, त्या म्हणाल्या होत्या मी रोज योगा करते. रोज योगा, प्राणायाम आणि सप्तशती पाठ करत असल्याने मला कोरोना होऊ शकत नाही, असं उषा ठाकूर म्हणाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments