संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी ; आम्हाला कोरोना झाला आहे..परीक्षा देऊ तरी कसे ?


गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत आहे, त्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 'गड्या आपला गाव भला' म्हणत काही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातून गावाकडे आगेकूच केली आहे.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकारने कालच नवे कठोर निर्बंध लागू केले आहेत. यातच विकेंड लॉकडाऊन दिवशी येत्या ११ एप्रिलला संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा प्रस्तुत परिस्थिती मध्ये घेणे धोक्याचे असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी आता स्पर्धा परीक्षा विद्यार्थी करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी १४ मार्च रोजी नियोजित असणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा सरकारने अशीच पुढे ढकलली होती. यावर राज्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यामुळे सरकारला नमते घेऊन ही परीक्षा २१ मार्चला घ्यावी लागली होती. मात्र आता राज्यात कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. स्पर्धा परीक्षा करणारे बरेच विद्यार्थी हे पुण्यात अभ्यास करत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातच वैभव शितोळे नावाच्या तरुणाचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसोबतच इतरही विद्यार्थ्यांनी केली आहे. 

राज्य सरकार मागील अनुभव लक्षात घेता आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकार आयोगाशी बोलून योग्य तोडगा काढेल अशी आशा विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र सदर निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments