केंद्र सरकारने काल देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या १० शहरांची नावं घोषित केली, यामध्ये ९ शहरं ही महाराष्ट्रातील असल्यानं एकच खळबळ उडाली. प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी त्या भागांमध्ये कडक निर्बंध प्रशासनातर्फे लागू केले आहेत. अशाच मराठवाड्यातील एका जिल्ह्यात आता ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, बीड जिल्ह्यानंतर आता परभणीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून २५ मार्च ते १ एप्रिल असा एकूण आठवडाभराचा कडक लॉकडाऊन परभणीत घोषित करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक व व्यापारी यांनी या लॉकडाऊनला विरोध केला असतानाही प्रशासनातर्फे हा लॉकडाऊन नागरिकांवर लादण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू तसेच परभणी शहर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने सुरुवातीला प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली.
सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्याची खात्री झाल्याने परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात एक आठवड्याचा कडक लॉकडाउन घोषित केला आहे. या लॉकडाऊन दरम्यान सकाळच्या वेळेत ९ वाजण्या अगोदर घरपोच भाजीपाला आणि किराणा सामान पोहोचवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र संपूर्णतः संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय विभागात काम करणारे व्यक्ती यांना यातुन सुट देण्यात आली आहे, तसेच वैद्यकीय आस्थापना या सुरू राहतील त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही आस्थापनांना सुरू ठेवण्यास परवानगी असणार नाही.
0 Comments