लवकरच जनतेच्या मनातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर करेल - उपमुख्यमंत्री अजित पवार


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील उमेदवारीची चाचपणी करण्यासाठी अजित पवार अन् जयंत पाटील पंढरपुरात दाखल. मात्र आत सोडत नाही म्हटल्यावर कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते.

पंढरपूर येथील श्रीयश पॅलेस येथे आज रविवारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भातील आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी करमाळा आमदार संजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, भगीरथ भालके आदी तसेच पंढरपूर सांगोला मंगळवेढा माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हॉलमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे नियोजन झाले होते, मात्र वाढती गर्दी तसेच आपापली भूमिका पटवून देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे गोंधळ वाढला. हे पाहून व्यासपीठावर बसलेले अजित पवार आणि जयंत पाटील उठून बंद खोलीत गेले. ‘जाहीर चर्चा नको. जे काही सांगायचे ते तुम्ही खाजगीत बंद खोलीत सांगा,’ असे अजित पवारांनी स्पष्टपणे सुनावले.

त्यामुळे व्यासपीठावर भगीरथ भालके एकटेच बसले होते. बंद खोलीत अजित पवार, जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्ता भरणे यांनी प्रत्येकाशी व्यवस्थित चर्चा केली. या मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीसाठी फायद्याची ठरेल, याचीही चाचपणी केली. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर अहवाल तयार करून तो आज दिल्लीत शरद पवार यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर्चा करुन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल.

चर्चेनंतर पार पडलेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर जनतेच्या मनातील माहविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करु असे आश्वासन दिले. यावर तेथील उपस्थित जनतेने, सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष जो उमेदवार देतील त्याला मोठ्या मताधिक्‍याने विजयी करू असे ठणकावून सांगितले.

Post a Comment

0 Comments