औरंगाबाद : विद्यापीठातर्फे १०८४ गाइडना नारळ, ३६१ जणांना गाइडशिप; निकषात न बसणाऱ्यांची गाइडशिप रद्द



डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अखेर संशोधन केंद्र नसलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची गाइडशिप रद्द केली आहे. पूर्वी १४४५ गाइड होते. आता १०८४ गाइडची गाइडशिप गेली असून नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या ३६१ गाइडलाच मान्यता दिली आहे. या गाइडकडे फक्त ७६५ जागा रिक्त आहेत. “पेट’ अर्थात पीएचडी एंट्रन्स टेस्ट उत्तीर्णांची संख्या मात्र ४,२९९ आहे. त्यामुळे गाइडची संख्या वाढवण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यावर दबाव वाढणार आहे. पण ते भूमिकेवर ठाम राहतात की घूमजाव करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन पदव्युत्तर प्राध्यापक, महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि विद्यापीठ मान्यताप्राप्त संशोधन केंद्र असेल तरच संलग्नित विद्यालयातील प्राध्यापकांना गाइडशिप देण्याचा विद्यापीठाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. संशोधनातील गुणवत्ता वाढवण्यासाठी कुलगुरूंनी हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

कुलगुरूंच्या या भूमिकेचा विविध प्राधिकरणांतील सदस्यांनी वेळोवेळी विरोध केला आहे. यासंदर्भात कार्यप्रणाली ठरवण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेत एक समितीदेखील गठित केली होती. संशोधनाची प्रक्रिया आता २२ मार्चपासून सुरू झाली आहे. पीएचडीसाठी ३ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल. तत्पूर्वी गाइडची संख्या, पीएचडीच्या रिक्त जागा प्रशासनाला जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संशोधन केंद्र असलेल्या फक्त ३६१ गाइडना विद्यापीठाने ग्राह्य धरले आहे. चारही विद्याशाखांतील गाइडकडे २०६० पीएचडीच्या जागा आहेत. त्यापैकी १५२५ विद्यार्थ्यांचे या गाइडकडे संशोधन सुरू आहे.

आधीच्या विद्यार्थ्यांना संशोधनकार्य पूर्ण करता येईल
निकषात न बसलेल्या गाइडला यापूर्वी संशोधनासाठी विद्यार्थी दिलेले आहेत. त्यांचे संशोधनकार्य मात्र पूर्ण करून घेता येईल. विद्यापीठ निकष पूर्ण न करणाऱ्या गाइडला यापुढे विद्यार्थी देणार नाही डॉ. गणेश मंझा, उपकुलचिव, पीएचडी विभाग

पत्रकारितेत आता एकच गाइड
जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयात सर्वांची गाइडशिप विद्यपीठाने रद्द केली आहे. विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ. दिनकर माने यांच्या एकट्याचीच गाइडशिप निकषात बसणारी आहे. बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव सानप, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या डॉ. विशाखा गारखेडकर आणि प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांचे नव्या यादीत नाव नाही. एमजीएम स्वतंत्र विद्यापीठ झाल्यामुळे डॉ. शेळके आणि डॉ. गारखेडकर यांना वगळले आहे. फाइन आर्ट, अन्न तंत्रज्ञान, संस्कृत आणि जैवतंत्रज्ञान या विषयांतही प्रत्येकी एकच गाइड आहेत.

सर्वाधिक गाइड विज्ञान व तंत्रज्ञानचे
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे सर्वाधिक १६९ गाइड असून इतर तीन विद्याशाखांच्या तुलनेत रिक्त जागाही सर्वाधिक आहेत. या शाखांत ९७२ जागा असून त्यापैकी ६४५ जणांचे संशोधन सुरू आहे. त्यामुळे ३८० जागा रिक्त आहेत. आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखेत सर्वात कमी ३८ गाइड असून २१२ जागा आहेत. पैकी १९२ विद्यार्थ्यांचे संशोधन सुरू आहे. फक्त ५४ जागा शिल्लक आहेत. मानव्य विद्याशाखेत १२१ गाइड असून २६५ जागा आहेत. ५०० जणांचे संशोधन सुरू आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेत ३३ गाइड आहेत. एकूण १६६ जागा असल्या तरी १८८ विद्यार्थी संशोधन करत आहेत. त्यामुळे ६६ विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नव्याने नोंदणी करता येईल.


Post a Comment

0 Comments