सचिन वाझेंच्या मर्सिडीजमध्ये पैसे मोजण्याचे मशीन आणि भाजप नेत्याचे फोटो


 मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने  अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी पोलिसांनी शोधून काढली असून यात नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी असे मशीन वापरले जाते. मात्र, सचिन वाझे आपल्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवत होते, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट आला असून जप्त केलेल्या या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात काही फोटो देखील ट्वीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचे फोटो आहेत, असा दावा सावंत यांनी केला आहे.आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

देवेन शेळके यांची १७ ऑक्टोबर २०२० रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबद्दलचे नियुक्ती पत्रच सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे. अंबानी स्फोटकं प्रकरणाचा तपास करत असताना एनआयएने सोमवारी रात्री सचिन वाझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात छापा टाकला होता. आठ तासांच्या शोध मोहिमेत वाझे यांच्या कार्यालयातून दोन डीव्हीआर (सीसीटीव्ही चित्रण साठविण्याचे यंत्र), लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड, संगणक आणि काही कागदपत्रे एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतली होती. त्याचबरोबर मंगळवारी काळ्या रंगाची मर्सिडीज जप्त केली होती. ही मर्सिडीज वाझे यांनी वापरल्याचा संशय आहे. त्यामुळे भाजपाकडून पुन्हा एकदा वाझे यांना निशाणा केलं जात आहे.

Post a Comment

0 Comments