सराफ व्यापाऱ्यांवर हल्ला करून लूटमार करणारी आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद , एकूण ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. ची धडाकेबाज कामगिरी


अक्कलकोट/प्रतिनिधी:

तडवळ ता.अक्लकोट येथील गणेश ज्वेलर्स शॉप दुकानाचे मालक मलिकार्जून गुडप्पा पोतदार व त्यांचा भाउ सचिन सुरेश पोतदार हे दोघे दि.२३/०३/२०२१ रोजी दुकानात दिवसभर सोने चांदीचा विक्रीचा व्यवहार करून नेहमीप्रमाणे दुकान बंद करून दुकानात शिल्लक राहिलेले १ किलो २०० ग्रॅम सोन्याचे दागिने व अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ५४,३४,०००/-रू. किंमतीचे दागिने एका काळया रंगाच्या रेगझीन बॅग मध्ये घालून ते दोघेजण त्यांचे यूनीकॉर्न मोटार सायकल नं. एम एच १३ सी एफ ९६०९ या वरून तडवळ ते कोर्सेगांवकडे सायंकाळी ६:०० वा.चे सुमारास घराकडे जात असताना मौजे मुंडेवाडी जाणारे रोडवरील तडवळ गांवालगत असलेले रेल्वे गेट जवळ आले असता समोरून दोन मोटार सायकलवरील अनोळखी ५ इसमांनी त्यांची मोटार सायकल अडवून त्यांचे डोळयात चटणी टाकून त्यांचेजवळील लोखंडी रॉडने त्यांना डोक्यात व हातावर मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचेजवळील दागिन्याची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादीने पिवळया रंगाचा शर्ट असलेले इसमास मिठठी मारून पकडले.

 असता इतरांनी त्यांचेजवळील बॅग हिसकावून घेवून जात असताना चोर चोर म्हणून ओरडल्याने रस्त्याने जाणारे लोक जमा झाले व चोरटे मोटार सायकलवरून केगांवचे दिशेने पळून गेले म्हणून पकडलेल्या इसमासह इतर अनोळखी इसमांनी सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून नेले म्हणून मलिकार्जून गुडप्पा पोतदार वय ३७ रा. कोर्सेगाव ता.अक्लकोट यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुं.र.न.१०९/२०२१ भा. द.वि.का.क ३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हयाचे ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, तसेच गुन्हे शाखेकडील
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भेट देवून गुन्हयाची माहिती घेतली. पकडलेल्या इसमाव
विचारपूस करता त्याने सांगितले की,तो त्याच्या भावासोबत आल्याचे सांगून इतरांची अर्धवट नांवे सांगून, अधिक काही माहित नसल्याचे सांगितले.

त्यावरून गुन्हयाची गुंतागुंती वाढल्याने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी रवींद्र मांजरे व त्यांचे पथकास तांत्रिक पध्दतीने विश्लेषन करून गुन्हयाची उकल करण्याबाबत सुचना दिल्या.

गुन्हयाचे तांत्रिक पध्दतीने विश्लेषन करीत असताना माहिती मिळाली की, सदर गुन्हयात अलमेल ता. सिंदगी, गुब्बेवाड ता. इंडी जि. विजापूर तसेच गादगी ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक येथील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी, रवींद्र मांजरे यांचे पथकास मिळालेल्या माहिती प्रमाणे कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथक हे मौजे अलमेल, गुब्बेवाड येथे जावून ०२ इसमांची माहिती काढून, बातमीदाराची मदत घेवून त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले, नंतर त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचापूस केली असता समजले की, मौजे अलमेल व गुब्बेवाड येथील इसमांची मौजे गादगी ता. औराद जि. बिदर येथील काही इसमांची मागील ०४ महिन्यापूर्वी इंडी येथील हॉटेल मध्ये जेवणखान करीत असता ओळख झाली. त्यावेळी “ बिदर कडील इसमांनी त्यांना काही लुटालुटीचे मोठे काम असेल तर सांगा ? आम्ही ते काम करून तुम्हांला ही वाटणी देतो’ असे सांगितले होते तेंव्हा पासून
त्यांची जवळीक वाढली होती. मौजे गुब्बेवाड येथील इसमाने मौजे तडवळ ता. अक्कलकोट येथील ज्वेलरी शॉप दुकानाची माहिती काढून त्यांना गुन्हा करण्यासाठी दिनांक २३/०३/२०२१ रोजी बोलावून घेतले होते. त्यानुसार गादगी ता. औराद जि. बिदर येथील ०३ इसम, अलमेल येथील ०१ इसम, इंडी येथील 0१, विजापूर येथील ०१ असे एकूण ०६ जण इंडी येथे एकत्र जमले तेथून दोन मोटार सायकलवर मौजे तडवळ ता. अक्कलकोट येथे येवून त्यांचेपैकी एकास दुकानाजवळ टेहाळणी करण्यासाठी सोडून इतर ०५ जन सराफ येण्याजाण्याच्या रस्त्यावर थांबले होते. सराफ दुकानदाराची मोटार सायकल आडवून त्यांचे डोळयात चटणी टाकून, लोखंडी रॉडने मारून, जखमी करून त्यांचेजवळील बॅग हिसकावून आणल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही गांवाकडे येवून चोरलेली बॅग ही एका शेतातील मक्याचे पिकामध्ये पुरून ठेवल्याचे सांगितले. त्यांचे कब्जातून ८५४.७२ मि.ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे मुळ दागिने, ७८७ ग्रॅम वजनाचे चांदीचे मुळ
दागिने असा एकूण ४१,६०,२४०/- (४१ लाख ६० हजार २४० रू.) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील आरोपीतापैकी काही आरोपी हे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून मौजे गादगी ता. औराद जि. बिदर येथील एका इसमा विरुध्द चोरी व खूना सारखे गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांना गुन्हयाचे तपासकामी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि तुकाराम राठोड हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments