प्राथमिक शिक्षकाकडे कोट्यावधींची बेहिशोबी संपत्ती; ‘हे’ काम करुन करत होता पिळवणूक


भोपाळ | अनेक लोक वर्षानुवर्षे काम करतात पण त्यांची पाच-दहा लाखांची बचत होत नाही. परंतु प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक असेलेल्या पंकज श्रीवास्तव यांनी इतकी संपत्ती कमावली की, अखेर त्यांच्या घरावर लोकायुक्तांना छापा मारावा लागला आहे. आणि यानंतर समोर आलेली माहिती खूपच धक्कादायक आहे.

मध्य प्रदेशमधील भोपाळच्या पोलिसांनी उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा आरोपावरुन पंकज श्रीवास्तव यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांना घरात मिळालेल्या संपत्तीच्या कागदपत्रांवर विश्वास बसला नाही. लोकायुक्तांनी टाकलेले हे धाडसत्र तब्बल ११ तास चालले.

१९९८ पासून पंकज श्रीवास्तव हे प्राथमिक शिक्षक आहेत. या मागील २३ वर्षांमध्ये त्यांनी ३६ लाख ५० हजार रुपये मासिक पागारातून कमावले आहेत. परंतु त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरीशिवाय हा माणूस सावकारीचं काम सुद्धा करतो. यामुळे जे लोक कर्ज फेडू शकत नाही त्यांची संपत्ती या माणसाने बळकवली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पंकज हा गरजू लोकांना चढ्या दराने कर्ज देत होता. तसेच संपत्ती गहाण ठेवून कर्ज देण्याचे काम करत होता. त्याचे कर्ज न फेडल्यास तो संपत्ती स्वत:च्या नावावर करून घेत असे.

 शिक्षकाच्या घरात मिळालेल्या कागदपत्रांच्या मालमत्तेचे मुल्य पाच कोटी इतके आहे. यामध्ये २५ एकर जमीन, ८ प्लॉटचा समावेश आहे. याशिवाय ठिकठिकाणी या व्यक्तीची गुंतवणूक आहे. या प्रकरणात पंकज श्रीवास्तव याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments