कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी विधानासभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वीच आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनाम दिला आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली असून, विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता देखील निर्माण झाली आहे. राज्यात सध्या ३ पक्षाचे महाविकासआघाडी सरकार असून, पूर्वी कॉंग्रेसकडे असलेले विधानसभा अध्यक्ष पद हे पुन्हा काँग्रेसकडेच राहणार, हे निश्चित मानलं जात आहे. काँग्रेसने सध्यातरी आपले पत्ते खुले केले नसले तरी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून एक नाव ठळकपणे समोर आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावान आमदार संग्राम थोपटे यांच्या गळ्यात पडणार विधानसभा अध्यक्षपदाची माळ?
दरम्यान, काँग्रेस पक्षातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावान आमदार संग्राम थोपटे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते विधानसभा अध्यक्षपद मिळावे यासाठी दिल्लीत फिल्डिंग लावत असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी लवकरच संग्राम थोपटे यांच्या नावाची औपचारिक घोषणा
पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, पवारांच्या बालेकिल्ल्यात देखील संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा गड कायम राखला असून त्यांची एक वेगळी क्रेज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांच्यासारख्या निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी लवकरच संग्राम थोपटे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदे जाहीर करण्यात आली होती. संग्राम थोपटे यांची वर्णी मंत्रीपदासाठी लागेल अशी थोपटे यांच्या कार्यकर्त्यांची आशा होती. मात्र, थोपटे यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यात मोठा राडा केला. थोपटे समर्थकांनी आक्रमक होत थेट पुण्यातील काँग्रेस भवनाचीच तोडफोड केली. त्यामुळे संग्राम थोपटे हे राज्यभरात चर्चेत आले. मात्र त्यावेळी थोपटे यांनी हात झटकत मला या तोडफोडीची माहिती नसल्याची सारवासारव केली होती.
संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी आपली नाराजी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून दिली
संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात कॉंग्रस भवनाची तोडफोड करून, आपली नाराजी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून दिली होती. सध्या या घटनेला एक वर्ष जरी लोटले असतील तरी आता थोपटे अखेर काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अद्याप थोपटे यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी या पदावर त्यांचीच नियुक्ती होईल, असं सांगण्यात येत आहे.
0 Comments