वैराग/प्रतिनिधी:
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा व सक्तीची वीजबिल वसूली थांबवून कनेक्शन तोडणे तात्काळ थांबवा व थकीत ऊसबिले तात्काळ जमा करा या मागणीसाठी शुक्रवारी १९ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी- सोलापुर मार्गावर वैराग ता.बार्शी येथिल छत्रपती शिवाजी चौकात रास्तारोको करण्यात आले. लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहेत, त्यातच ऊसाची बिले मिळालेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिल भरणेसाठी आर्थिक अडचण आहे.
अशाच विज मंडळाकडून सक्तीची वीजबिल वसुली होत असून थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु आहे ती तात्काळ थांबवावी. लॉकडाऊन च्या कालावधीत सर्वांचे नोकरी, व्यवसाय, रोजगार बंद होते त्यामुळे लॉकडाऊन च्या कालावधीतील वीजबिल शासनाने माफ करावे . लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा देखिल विजय रणदिवे यांनी यावेळी दिला. सुमारे अर्धातास चाललेल्या रास्तारोको मुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वैराग येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी चौकात वाहतूक काही काळ खोळंबली होती .
यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागण्यांचे निवेदन विज वितरणचे सहाय्यक अभियंता गुजर व वैरागचे सर्कल धनकवडे यांना देण्यात आले. या आंदोलनात हणमंत कापसे, चंद्रकांत निचळ, विजय साठे, दिनेश शिंदे, धर्मराज पंखे, सचिन मस्के, समाधान यादव, शरद निचळ, केशव जगताप, महादेव शिंदे यांच्यासह वैराग भागातील शेतकरी व स्वाभीमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी सचिन मस्के, दिनेश शिंदे यांनी विचार व्यक्त केले.
0 Comments