"मुलूखमाती - कहानी गाव खेड्यातील माणसांची.!"


✒️शिवशाहीर राजेंद्र वामनराव सानप, चैतन्य निवास, भवानीनगर, हुतात्मा नगरी वडूज, पोस्टमास्तर,मायनी-४१५१०२

                  
व्यंकटेश माडगूळकर यांच्या नंतर अनेक वर्षांनी सातारा व सांगली जिल्ह्यातील विशेष करून माणदेशातील गाव खेड्यातील व्यक्तिचित्रे मोठ्या ताकतीने व नव्या शैलीत मांडण्याचे काम लेखक संपत मोरे सर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम भागाचे विशेष करून सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा- कोयना, वारणा-माणगंगा, येरळा या नद्या काठचा परिसर हा मुलुख मातीत चितारण्यात आला आहे. 
पश्चिम महाराष्ट्राच्या मातीतील एक उमदे व्यक्तिमत्व, पत्रकार, लेखक, रिपोर्ताज लेखनावर ज्यांची मोठी पकड आहे असे आमचे मित्र श्रीयुत संपत मोरे सर यांचे मुलूखमाती हे पुस्तक ग्रामीण भागातील दैनंदिन संघर्ष करणाऱ्या खर्‍याखुर्‍या माणसांची कथा आहे.! 

शांताबाई या गावखेड्यात सलून चालवणाऱ्या म्हणजेच वारीक काम करणाऱ्या महिलेची कथा ऐकल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसतो. पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अशी जगावेगळी स्वकर्तुत्वाने उठून दिसणारी एक माय माऊली आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. कुस्तीच्या फडात मातीचा कण आन माणसांची मनगट पेटविण्याचे काम करणारे ज्येष्ठ निवेदक शंकर आण्णा पुजारी यांची कथा ऐकल्यानंतर एक वेगळा उत्साह संचारतो. अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांची कविता हृदयाला स्पर्श करून जाते.  साहित्यिकांची मांदियाळी ही फक्त मोठ्या शहरांसाठी नसून गावखेड्यात ही माय मराठीचे सच्चे उपासक कवी लेखक साहित्यिक आपल्या दैनंदिन जीवनात संघर्ष करून साहित्यात योगदान देत आहेत याचा एक वेगळा पैलू समोर येतो. निपाणी चे लेखक महादेव मोरे हे त्याचे यथार्थ उदाहरण ठरतात. 

वाळवंटात एखादा झरा असावा त्याप्रमाणे कानडी मुलखातील फडतरवाडी आपले मराठीपण जपत आहे हे पाहून अभिमान वाटतो. ऑलम्पिक चे स्वप्न पाहणारी झुंजार कुस्तीपटू संजना बागडीची कथा ऐकल्यानंतर तिच्यासाठी झटणारे आजोबा शेलार मामा भासतात. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याचा संघर्ष माणदेशाची उज्वल परंपरा सांगून जातो. किरण भगत,संजना बागडी सारख्या उदयन्मुख होतकरू खेळाडू ना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे याची जाणीव यातून निर्माण होत आहे हेही नसे थोडके. 

ग्रामीण भागाचे इतिहासकार म्हणून हेळवी लोकांचे मोठे महत्त्व आहे. आधुनिकतेच्या गराड्यात आपल्या गाव खेड्यातील लोकांच्या पारंपारिक वंशावळीच्या नोंदी ठेवण्यासाठी झटणारा हा समाज पाहिल्यानंतर यांच्यासाठी लोकसहभाग व गावागावातून मदतीचा हात पुढे आला पाहिजे हे प्रकर्षाने जाणवते. सायकल वेड्या गणपत दादांची ऐकल्यानंतर गावाकडील जुन्या आठवणी जाग्या होतात. 

मुलुख मातीत चितारलेली अनेक व्यक्तिचित्रे हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा आरसा ठरतात. यातील प्रत्येक व्यक्ती चित्राशी मिळतेजुळती माणसं आपणाला आपल्या अवतीभवती केव्हा ना केव्हा भेटलेली आहेत आहे असा भास होतो.! 

पेरा आजीची कथा ऐकताना मला माझी "परूआजी" आठवली.प्रत्येक खेडेगावात सुईनकाम करणारी एखादी आजी असते जिच्या हाताने अनेक पिढ्यांनी पहिला टाहो फोडलेला असतो.!

ज्येष्ठ अभिनेते विलास बापूंची कथा हृदयाला स्पर्श करते. एक ग्रामीण भागातील एक रांगडा कलाकार, माया नगरीच्या झगमगाटापासून दूर राहिल्याने अनेक संधींना मुकला, परंतु स्वकर्तुत्वावर निर्माता-दिग्दर्शक, एक रांगडा अभिनेता असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो. 

झुलवा कार लेखक उत्तम बंडू तुपे यांची उपेक्षा पाहिल्यानंतर मन गलबलून येतं. ग्रामीण भागातील हे सरस्वतीचे उपासक शेवटपर्यंत कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत हा संदेश मात्र मनावर कायमचा ठसतो. 

क्रांती विरांगणा हौसाअक्का यांची कथा ऐकताना क्रांतिसिंह नाना पाटील व प्रतिसरकार, तान्ह्या मुलाला घरी ठेवून क्रांती कार्यास झोकून देणाऱ्या हौसा आक्कांचा त्याग डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांनी केलेलं क्रांतिकार्य अजोड व क्रांतीसिंहाच्या मुलीस शोभेल असेच आहे!

बापू बिरू वाटेगावकर यांची कथा ऐकल्यानंतर अन्यायाविरुद्ध लढण्याची एक अनामिक उर्मी या महाराष्ट्राच्या मातीत वरदान रूपानं चिरंतन आहे याची साक्ष पटते. 

वाठार च्या दुर्गा खाणावळीतील सोनाबाई व दुर्गाबाई यांनी क्रांतिकारकांचा जेवण पोहोचवण्याची केलेली व्यवस्था, इंग्रज अधिकाऱ्यांच्या साठी सुरू झालेली खानावळ क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांच्या सहकारी क्रांतीकारकांना जेवण पोहोचवत होती हे ऐकल्यानंतर नवल वाटते. ते जेवण पोहोचवण्याची जोखीम पत्करणारा एक अनामिक पोस्टमन क्रांतिकार्यात आपले योगदान देतो हे ऐकून मी ही पोस्ट विभागाचा एक कर्मचारी आहे याचा मनस्वी आनंद होतो व छाती अभिमानाने फुलून येते.!

संपत मोरे सर यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य परंपरेत अस्सल ग्रामीण भागातील व्यक्तिचित्रे,त्यांची सुखदुःखे, रूढी परंपरा यांचे भावस्पर्शी चित्रण केले आहे. त्यामुळेच मुलुख मातीचा मृदुगंध सर्वत्र दरवळतो आहे यात शंका नाही. 

मोरे सरांना पुढील लेखनास व वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद.!                  

Post a Comment

0 Comments