प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात निसर्ग मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ' पर्यावरण संवर्धन ' या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी अनिल चौगुले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मनस्वी स्वागत करून बी.ए. भाग ३ ची विद्यार्थिनी मुस्कान पटेल हिने या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकेच्या माध्यमातून त्यांनी मानव व पर्यावरण यामधील नाते संबंध अतूट राहणेबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे हा या कार्यक्रमाचा हेतू होता हे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे साधन व्यक्ती व निसर्ग मित्र अनिल चौगुले या विषयावर भाष्य करताना म्हणाले की,निसर्गाने तयार केलेले घटक निसर्ग स्वीकारतो, परंतु मानवाने तयार केलेले घटक किंवा वस्तू निसर्ग स्वीकारत नाही. त्यामुळे मानवाने तयार केलेल्या वस्तू मानवानेच नष्ट केल्या पाहिजेत, अन्यथा पर्यावरण प्रदूषण होऊन त्याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावा लागतो. निसर्गातून आपण जेथून घेतले तेथेच टाका म्हणजे ते निसर्ग स्वीकारेल. निर्माल्यातील घटक जमिनीतून तयार झालेली आहेत ते जमिनीतच टाका म्हणजे ते जमिनीत मिसळून कंपोस्ट खत तयार होईल ते पिकांसाठी व वनस्पतींसाठी पोषक होईल परंतु हे निर्माल्य पाण्यात टाकले तर ते पाणी स्वीकारणार नाही उलट जलप्रदूषण होईल. स्थानिक भागात पिकणारी व ज्या त्या ऋतूत पिकणारी फळे तसेच भाजीपाला खा त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्त्ती निर्माण होईल. पर्यावरण संवर्धनासाठी आता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. श्री.अनिल चौगुले यांनी पर्यावरण संवर्धनासाठी स्लाईड शोच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्राणीव वनस्पतींची सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे म्हणाले पर्यावरण संवर्धनाबाबत आता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विकासाच्या नावाखाली वाढते उद्योगधंदे, वाढती वाहनांची संख्या , नागरीकरण, आधुनिक शेती पद्धती यामुळे जमिनीचे प्रदूषण, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊन निसर्गाचे चक्र बिघडले आहे. मानवाच्या या बेजबाबदार वर्तनामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. एकीकडे नद्यांना महापूर तर दुसरीकडे भीषण दुष्काळ अशी परिस्थिती पाहावयास मिळते आहे. जागतिक तापमान वाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागल्याने समुद्र आपल्या मर्यादा ओलांडत आहे, वन्य प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करीत आहेत कारण मानवाने त्यांच्या आधिवास क्षेत्रात अतिक्रमण केले आहे. वनस्पतींची जंगले नष्ट होऊन आता सिमेंट काँक्रीटची जंगले उभी राहत आहेत, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याच्या नैसर्गिक क्रियेला अडथळा येऊन भूजल पातळीत घट होत आहे. मानवाच्या हव्यासापायी तो निसर्गाला ओरबाडतो आहे. आज इतर प्रदूषणांबरोबरच माणसाच्या विचाराचेही प्रदूषण झाले आहे आणि ते अतिशय धोकादायक आहे.
या कार्यक्रमाचे सुंदर आभार रोहीत भोळे ( बी.ए.भाग ३ ) याने मानले तर नियोजनबद्ध सूत्रसंचालन कु.सोनम कांबळे ( बी.ए.भाग ३ ) हिने केले. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला याचे सर्व विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग मंडळ समिती प्रमुख डॉ. माधवी सोळंकुरकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.
0 Comments