भावकीत लग्न केल्याने कुटुंबावर बहिष्कार ; युवकाच्या कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ , पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.....



 वसईत राहणाऱ्या एका युवकाने भावकीत लग्न केल्याने त्याचवर आणि त्याच्या कुटुंबावर सर्व गावाने बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली. गावाने बहिष्कार टाकल्याने हा युवक कुटुंबासहित मागील तीन महिन्यापासून गाव सोडून वसईत राहत आहे. 

या संदर्भात रत्नागिरी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सौरव विजय जाधव (२३)सध्या वसई पूर्व एव्हर शाईन येथे राहत असून त्याचे मूळ राहणार रत्नागिरी देवरुख, पाटगाव बोद्धवाडी आहे. याचे याच्याच भावकीतील नवी मुंबई येथील एका मुलीशी प्रेमसंबध जुळले. पण एकाच भावकीत असल्याने त्यांच्या प्रेमाला घरच्यांनी विरोध दर्शविला होता. 

पण त्यांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता ३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण धार्मिकविधिनुसार खारघर येथे लग्न केले आणि या लग्नाचे विपरीत परिणाम सौरव आणि त्याच्या कुटुंबाला सहन करावे लागले. या लग्नाची माहिती गावी समजताच भावकीच्या मंडळीने बैठक बोलावून सौरव आणि त्याच्या कुटुंबाला समाजातून काढून टाकले आणि गावातही संदेश पाठविला की सौरव आणि त्याच्या कुटुंबाला कोणतीही मदत करू नये, समाजातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये. 

यामुळे सौरव आणि त्याचे कुटुंब गाव सोडून वसईला राहायला आले. पण त्यांनी आपला लढा कायम ठेवला.
 देवरुख पोलीस ठाण्यात १२ जणांच्या विरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध २०१६, भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम १२० ब, भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम १४३, १४९,१५३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तरीही गावबंदी सौरव ने माहिती दिली की, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही गावात कोणताही फरक पडला नाही. उलटपक्षी आरोपींना तातडीने जामीन मिळाल्याने गावातील कोणीच  बोलत नाही.

Post a Comment

0 Comments