✒️ मिस्टर रजनी (पत्रकार,कवी,लेखक)
Email id- misterajni@gmail.com
त्यांच्याकडे तुमच्या पिढ्यानपिढ्यांचं रेकॉर्ड असतं.अगदी आज्ज्या पणज्याच्या आज्ज्या पणज्याचं.ते दरवर्षी गावात येतात आणि तुमच्या घरात नवीन आलेल्या किंवा कमी झालेल्या माणसांच्या नावांच्या आणि जन्मतारखेच्या नोंदी आपल्या दफ्तरात करुन घेतात.त्याबदल्यात ते धान्य किंवा पैसे घेतात.त्यांच्या नोंदी मोडी लिपीत असतात त्यामुळे आपल्याला त्या सहजासहजी वाचता येणं शक्य नसतं.मोडी लिपी लिहीता वाचता येणारा हा एकमेव समाज...
(तशी मोडी लिपी मला अजिबात आवडत नाही कारण ही लिपी मला सत्ताधारी आणि हुकुमशाही वाटते कारण,तीचं स्पेलिंग Modi असं येतं.असो...)
मी बोलतोय "हेळवी" लोकांबद्दल.दरवर्षीप्रमाणे काल सकाळी दारावर नेहमीचाच हेळवी आला.आणि नेहमीप्रमाणे त्यांनं आपल्या खास शैलीत वशांवळ वाचायला सुरु केली...
आज्ज्या पणज्याची नावं वाचून झाल्यानंतर तो पुढं बोलू लागला तेव्हा त्यानं सांगितलं कि आमचे वाडवडील हे मुळचे वाईचे(जि-सातारा).त्यानंतर ते कराडमध्ये आले आणि तिथून ते थेट गोव्यातल्या मडगाव येथे जावून राहिले.पुन्हा तिथून ते थेट चंदगड तालुक्यातील कोळिंद्रे खालसा या गावात कायमस्वरुपी स्थायिक झाले(आमची गावं ही पूर्वी हेरे संस्थानात होती).आमच्या पूर्वज #देशमुख असं आडनाव लावत असत,अशी माहिती मिळाली.
हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर.तसा हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय. कारण मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.स्वतंत्र भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे अलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांकडे आले.
हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. काही ठिकाणी सुगीच्या दिवसात तर काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात.नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही. साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट; त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे. प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मुळाचा मूळपुरुष,मूळगाव सांगतात.एखादे कूळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का ? व कसे ?आले ते सांगतात. यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात.वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते.
पूर्वी हेळवी लोक बैलावरुन फिरत असता पण काळानुसार त्यानी बदल करत आता ते मोटरसायकल घेऊन येतात.आधुनिक जगाबरोबर स्वतःला जोडून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे अँड्रॉइड फोनसुद्धा आहेत...
वंशावळीतील नावे वाचत मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य किंवा पैसे घेतात. त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते.
हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते; परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते.लग्न, मुलाचा जन्म अशा नव्या नोंदींमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते.
वरवरुन हे वाचायला भारी वाटत असलं तरी इतर भटक्या समाजांप्रमाणे हेळवी समाजाच्याही काही समस्या आहेत.
१)शालेय शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या सततच्या भटकंतीमुळे नगण्य आहे.
२)शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना जातींच्या सरकारी सवलती व योजना यांची माहिती नाही.
३)हेळवी समाज कर्नाटकात संघटित आहे; परंतु महाराष्ट्रात तो संघटित नाही.
४)काही गावांचे हेळवी अकाली गेल्यामुळे त्या गावी दुसऱ्या हेळव्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.
५)त्याचबरोबर हेळवी परंपरा सांभाळण्यासाठी मुलगाच हवा या धारणेमुळे त्यांच्यात अपत्यांचा जन्मदर अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन करणे गरजेचे आहे.
बाकी,प्रामाणिकपणे आणि इमानेइतबारे तुमच्या वंशाचा इतिहास जपायचं काय हे लोक करत असतात.
दरवर्षी दारावर आले की हे आजोबा एकच प्रश्न विचारतात.कालही जाता जाता त्यानं आईला तोच प्रश्न विचारला,मग सुनबाई कधी येणार...?
0 Comments