"मर्दानी आखाडा"
✒️अमृता राजेंद्र घाटगे
कुस्तीच्या आखाड्याचे शहर... कोल्हापुरी रांगड्या भाषेचे शहर... छत्रपती शाहूमहाराज यांच्या चरणाने पावन झालेले शहर ... मराठमोळ्या मर्दानी खेळाचे शहर…या मर्दानी आखाड्यात मुलींची संख्या लक्षणीय वाढते आहे. त्याला कारणही तसेच आहे आजची स्री सुरक्षित आहे का? नाही कारण दररोज पेपर आणि सोशल मीडियावर बातम्या असतातच, अपहरण, बलात्कार, रॅगिंग, ऍसिड हल्ला मग आजची स्री सुरक्षित आहे असे आपण कसे म्हणू शकतो? मग याला उपाय काय तर आजची स्री नुसती सक्षम असून चालणार नाही तर कणखर असली पाहिजे. त्यासाठी मुलींनी मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्याच्या सुरक्षिततेसाठी अनेक ठिकाणी मर्दानी खेळ शिकवले जातात. त्यामधीलच एक नावाजलेला आणि ऐतिहासिक कला जपणारा आखाडा म्हणजे 'हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा'
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी अजरामर इतिहास निर्माण केला ती युद्धकला आणि हत्यारे आजच्या संगणकीय आणि स्पर्धेच्या युगात विस्मुर्तीत जात असली तरी काही इतिहासप्रेमींकडून ही शिवकालीन युद्धकला आणि हत्यारे चालविण्याचे कसब आजही जतन केले जात आहे. त्यातील एक आखाडा म्हणजे 'हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा' आखाड्याचे संस्थापक - अशोक मिस्री, प्रशिक्षक - अवधूत घाटगे, आणि प्रशिक्षक - श्रीकांत खोत यांनी मोजक्याच मुलांना घेऊन या आखाड्याची २ जानेवारी २०१० रोजी स्थापना केली.
मर्दानी कलेचा प्रचार-प्रसार करणे हे एकमेव कारण नसून, मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमाण हे मुख्य उद्धिष्ट होते. कालांतराने मुलासोबतच मुलींची संख्या ही वाढत गेली त्यामुळे सराव ही चांगल्या पद्धतीने चालू झाला. आखाड्यामध्ये मुलींना रणरागिणी आणि मुलांना मावळे असे संबोधले जाते. प्रशिक्षक- अवधूत घाटगे आणि प्रशिक्षक श्रीकांत खोत यांचा खेळ तर डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. शिक्षक एवढे पारंगत असतील तर मुले देखील कसे मागे पडणार, आपल्या आखाड्यातील मुलामुलींना घेऊन प्रत्येक स्पर्धेत हजेरी लावतात.
आपल्या कोल्हापूर मध्ये उडान हंट टॅलेंट या कार्यक्रमाचे २१ डिसेंबर २०११ ऑडिशन होते त्यामध्ये एकूण १०२ ग्रुपनी सहभाग घेतला होता. त्यामधील ५२ ग्रुपचे निवड झाली होती त्यामध्ये आपली शिवाजी पेठेतील 'हिंद प्रतिष्ठान आखाड्याचा ही सहभाग होता. संजय घोडावत इंस्टिट्यूड हे आयोजक होते. रोटरी क्लब, ९८. ३ टोमॅटो, दैनिक सकाळ पुरस्कृत २४ डिसेंबर रोजी उडान टॅलेंट चे वितरण समारंभ झाला. त्यामध्ये हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाड्याने प्रथम पारितोषिक पटकावले. त्यानंतर बऱ्याच स्पर्धेमध्ये असो, कार्यक्रमध्ये असो हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाड्याची उपस्थिती असायचीच.
२०१७ साली कलर्स चॅनेल प्रस्तुत 'इंडिया बनेगा मंच' महाराष्ट्रात हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाड्याची निवड झाली होती. त्या ठिकाणी आपल्या आखाड्याने कला जपत आपल्या कोल्हापूरचे नावलौकिक केले होते. हिंदी चित्रपटातील अभिनेत्री कीर्ती सेनेन आणि दिवंगत अभिनेते सुशांत सिंग राजपूत आणि आपल्या आखाड्याचे मावळे आणि रणरागिणीची पाठ थोपटली.
तसेच २०१७ मध्ये बिग सेलिब्रिटी हा टीव्ही शो हैदराबाद येथे झाला होता त्या शो मध्ये देखील हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडाच्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली, तेथेही आपल्या मावळ्यांनी आणि रणरागिणींनी महाराष्ट्राचे नाव लौकिक केले.
२०१८ मध्ये नेपाळ बॉर्डरवर सिक्किम स्टेट मधील नागरिकांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली, आपल्या मर्दानी खेळाचा जागर पूर्ण सिक्कीम मध्ये गाजवला. आपल्या कोल्हापूरचा नावलौकिक हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा दूरदूर पर्यंत नेट आहे. २०१९ मध्ये इचलकरंजी येथे युगंधरा फाऊंडेशन मार्फत राज्यस्तरीय भव्य मर्दानी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच आखाड्यांची सहभाग घेतला होता. कराड, सांगली, सातारा, मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधील ही बऱ्याच आखाड्यांची सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या आखाड्याचा विजयाचा झेंडा रोवला आहे.
मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यतरीय स्पर्धेमध्ये वैयक्तिक मर्दानी कला सादरीकरण मध्ये आपल्या कोल्हापुरातील हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाड्यातील रणरागिणी आणि मावळ्यांनी यश संपादन केले आहे. साऊथ इंडियन गायिका माया मातंगी यांनी इंग्लंड मधील एका गाण्याकरिता आखाड्यातील मुलीचा सहभाग घेऊन त्या गाण्यावर मर्दानी खेळाची कला सादर केली त्या इंग्लिश गाण्याला तिथे या गाण्याला सात पैकी साडेसहा स्टार मिळाले हे गाणे सुपरहिट झाले होते. कोल्हापुरातील आपल्या शिवाजी पेठ मधील या हिंद प्रतितिष्ठान मर्दानी आखाड्याने सातासमुद्रापार मर्दानी खेळाचा प्रचार प्रसार नेला आहे.
प्रशिक्षक अवधूत घाटगे आणि श्रीकांत खोत आपल्या मर्दानी आखाड्याची मुले मागे राहू नयेत आणि आपली कला सर्वदूर पर्यंत पोचविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. प्रत्येक वर्षी आखाड्यातून आतापर्यंत ९०० ते १००० पर्यंत मुले-मुली शिकून बाहेर मर्दानी कलेचे सादरीकरण करत आहेत आणि तेव्हडीच ऍडमिशन ही होतात. हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा' सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे. आखाड्यातील मुलामुलींना प्रत्येकवर्षी शालेय साहित्य वाटप केले जाते तसेच त्यांच्या शैक्षणिक खर्च देखील बघितला जातो. सद्या शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत, बोन्द्रेनगर, या तीन ठिकाणी आखाड्याच्या शाखा सुरु आहेत. मर्दानी कलेचे सादरीकरण करण्याकरिता १५० ते २०० विध्यार्थी आहेत.
६ जून शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आखाड्याच्या खर्चातून सर्व मुलांना रायगड येथे नेले जाते. तसेच सहा महिन्यातून एकदा आखाड्यातील मुलामुलींना नेवून गडकिल्याची स्वछता केली जाते मुलांना गडकिल्याची माहिती दिली जाते.
ऐतिहासिक कला जपून, त्या कलेचे शिक्षण देऊन, आजच्या मुलींना सुरक्षित बनवण्याचे कार्य तसेच उद्याचे सुजाण नागरिक बनवण्याचे काम प्रशिक्षक श्रीकांत खोत आणि अवधूत घाटगे करत आहेत, त्यामुळे ही कला असलेली कुठलीच मुलगी अत्याचाराला बळी पडणार नाही. तर ती लढेल म्हणूनच अनेक रणरागिनींना तयार केलेल्या हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाड्याला आणि प्रशिक्षकांना सलाम....
0 Comments