नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. मेलबर्न कसोटीत दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली आहे. त्यामुळे उमेश यादवला भारतीय संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे. उर्वरित कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन मराठमोळी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्याचा विचार करत आसल्याचे वृत्त आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान, ७ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
“अनेकांना असे वाटतय की नटराजनला कसोटी संघात जागा मिळावी, त्याने टी-२० आणि वन-डे मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे सर्व प्रभावित आहेत. परंतू आपल्याला हे विसरुन चालणार नाही की तो तामिळनाडूकडून फक्त एक प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. शार्दुलकडे मुंबईकडून रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे.” बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला माहिती दिली.
शार्दुलने याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र याच सामन्यात त्याला दुखापतीमुळे गोलंदाजी करता आली नाही. त्याच्या दृष्टीकोनातून तो प्रसंग थोडा दुर्दैवी होता. त्यामुळे त्याला उमेशऐवजी संघात जागा मिळू शकते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे घेणार असल्याचे कळतेय.
0 Comments