यंदा राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर'- आशिष शेलार



 'युतीत लढल्यामुळे महापालिका निवडणुकांत शिवसेनेचाच महापौर झाला. आता इथून पुढे शिवसेना आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे यावेळी राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर निवडून येईल,' असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय. 

आशिष शेलार हे ठाण्यात कोपरी प्रभागात देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. भाजपला सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले नाशिकचे वसंत गीते आणि सुनिल बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावरही आशिष शेलार यांनी टीका केली.

(Advertise)

'महाविकास आघाडीत सुरुवातीपासूनच बिघाड आहे. ही आघाडी बिघडलेली आहे. यांनी फक्त राज्याला बिघडवू नये, एवढीच इच्छा आहे. आम्ही आतापर्यंत युतीत निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक महापालिकेत शिवसेनेचा महापौर असायचा. परंतु आता आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे प्रत्येक महापालिकेवर भाजपचाच महापौर होईल,' असाही दावा आशिष शेलारांनी केला. 

भाजपमध्ये असलेल्या वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावर बोलताना शेलार म्हणाले, फोडाफोडीचे राजकारण किती केले तरी दुर्बलाला बळाचे बळ कधीच मिळू शकत नाही. आम्ही स्वबळावर लढणारे आहोत. ते तिघेही दुर्बल आहेत, असे म्हणत शेलार यांनी महाविकास आघाडीवर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.


Post a Comment

0 Comments