प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेनंतर शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र पुन्हा शेतकरी आंदोलनाला पाठबळ देत असल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी रात्री एक खळबळजनक दावा केला आहे. टिकैत यांनी अनेक भाजप नेते पक्ष सोडण्याचा तयारीत असल्याचा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
टिकैत यांनी शुक्रवारी रात्री ट्विटरवरुन अनेक भाजपा नेते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. “मला आज अनेक भाजपा नेत्यांचे फोन आले. त्यांनी आम्ही सुद्धा राजीनामा देत आहोत असं मला सांगितलं आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. अजूनही आम्ही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही, असं हे नेते म्हणाले,” असं ट्विट टिकैत यांनी केलं आहे.
टिकैत यांनी शनिवारी सकाळीही एक ट्विट केलं असून मोठ्याप्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पुन्हा जमा होण्यासाठी निघाले असल्याचं म्हटलं आहे. “आज सकाळपासूनच गावांमधून ट्रॅक्टर निघण्यास सुरुवात झालीय. गाझीपूर सीमेवर आज कालपेक्षा अधिक शेतकरी पोहचणार आहेत,” असं टिकैत यांनी म्हटले आहे.
0 Comments