'मी कोल्हापूरला जाणार असल्याच्या वक्तव्यावरून कुणीही हुरळून जाऊ नये, घाबरून जाऊ नये,' असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांनी आज (दि. २६) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मी पुण्यात स्थायिक होणार नसून मी कोल्हापूरला जाणार असल्याचे विधान केले होते, त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, 'माझ्या कोल्हापूरला परत जाण्याच्या वक्तव्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. त्यामुळेच मला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. माझ्या त्या वक्तव्याने कुणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरुनही जाऊ नये. मला ते बोलताना इतकी चर्चा होईल असे वाटले नव्हते. माझे वाक्य असे होते की, केंद्राने मला दिलेले मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. केंद्राने मला सहजासहजी असेच पुण्यात पाठवलेले नाही. माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचे असते. त्यासाठी माशेलकरांना, गिरीश बापट यांनी पुणे सेटल होण्यासाठी चांगले असल्याचा सल्ला दिला. त्यावर मी म्हटले की पुणे खूप चांगले आहे. पण मी मिशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या कोल्हापूरला जाईल. त्यासाठी ५, १५ किंवा २० वर्षे असा कितीही वेळ लागू शकतो,' असेही चंद्रकांत पाटीलांनी स्पष्ट केले.
अजित पवार आता बोलू लागले आहे. त्याला आम्ही उत्तर देणार हे नक्की. कारण हा केवळ क्रिया आणि प्रतिक्रियांचा खेळ आहे. अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचे बघावे. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मुख्य म्हणजे भविष्यात शरद पवारांना एखादे मोठे पद कोणाला द्यायचा निर्णय घ्यावा लागला तर ते नक्की कोणाला देतील याचा अजित पवारांनी विचार करायला हवा', अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना चोख प्रत्युत्तर दिले.
0 Comments