'...जर आरक्षण द्यायचेच असेल तर ओबीसीतून द्या' - आबासाहेब पाटील


मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यावरून जोरदार टीका केली जात आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने देखील सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला एसईबीसीतून आरक्षण देता येत नसेल तर ओबीसी मधून आरक्षण द्या, अशी मराठा समाजाची ठाम भूमिका असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.

मराठा समाजाने एसईबीसीचे आरक्षण मागितलेले आहे. ईडब्ल्यूएसमध्ये आम्हाला घ्या, अशी आमची मुळीच मागणी नाही. सरकारला मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण देता येत नसेल तर ओबीसीमधून आरक्षण द्या, परंतु ईडब्ल्यूएसचा घातलेला घाट अत्यंत चुकीचा आहे, असेही आबासाहेब पाटील म्हणाले.

(Advertise)

काही ओबीसी नेत्यांच्या सांगण्यावरून आज मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये ढकलण्याचे काम सरकार करत आहे, हे कदापि आम्ही सहन करणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समन्वयकांना घेऊन हे चर्चा करतात आणि नंतर सांगतात आमची सकारात्मक चर्चा झाली. या सकारात्मक चर्चेचा आणि आमचा काहीच संबंध नसतो. आम्हाला आमच्या हक्काचे एसईबीसी आरक्षण मिळायलाच हवे, असेही आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

महिन्याभरापूर्वी सरकारने जीआर काढून मराठा एसईबीसीच्या विद्यार्थ्यांनी खुल्या वर्गातून प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्याची मुदतही काल संपली. मुदत संपल्यानंतर आता तुम्ही ईडब्ल्यूएसचे गाजर दाखवत आहात. या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा मराठा विद्यार्थ्यांना कुठेच फायदा होणार नाही. आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण नको, आरक्षण द्यायचेच असेल तर एसईबीसी किंवा ओबीसीतून द्या, असेही म्हणत आबासाहेब पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली.

Post a Comment

0 Comments