एक रुपया दंडाची प्रशांत भूषण यांना शिक्षा

न्यायालयीन अवमानप्रकरणी जेष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने एक रुपया दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची ही रक्कम १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिने तुरूंगवास आणि तीन वर्षे वकिली करण्यावर बंदी असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी शिक्षा ठोठावली. त्यात प्रशांत भूषण यांनी १५ सप्टेंबरपर्यंत १ रुपया दंड जमा करावा. दंड जमा न केल्यास तीन महिने तुरूंगवास आणि ३ वर्षे वकिलीवर बंदीच्या शिक्षेचा समावेश आहे.

प्रशांत भूषण यांच्या या खटल्याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल आज जाहीर केला. मागील सुनावणीच्या वेळी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती.


या वर्षीच्या जून महिन्यात प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयावर दोन ट्विट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याची स्वतःहुन दखल घेत न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले होते.


Post a Comment

0 Comments