ऑनलाईन शिक्षण प्रणालीत शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ; ऑनलाइन शाळा या सॉफ्टवेअरचे अनावरण

कोरोनाच्या महाभयंकर संकटाने संपूर्ण जग स्तब्ध झाले असल्याने शाळा-महाविद्यालये आजही बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सध्यातरी पुन्हा शाळेत येणे शक्य नसल्याने ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे, मात्र ग्रामीण भागात हा उपक्रम राबवताना शिक्षकांनी अधिक जबाबदारीने काम केले पाहिजे तरच विद्यार्थी हे ज्ञान आत्मसात करू शकतील.कागल येथील बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी आयोजित केलेल्या ऑनलाईन शाळा या सॉफ्टवेअरच्या अनावरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होतो.
 प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ऑनलाइन शाळा या सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी उपस्थित शिक्षकांना सॉफ्टवेअर वापरा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 ऑनलाइन शाळा या उपक्रमाची सुरुवात कागल पासून होत असून पुढे राज्यभर याची अंमलबजावणी होणार आहे. या परिस्थितीत शाळा अजुन किती दिवस बंद राहतील हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेणेबाबत शासन बांधील आहे.

ऑनलाइन शाळा या सॉफ्टवेअरचे जनक संदीप गुंड म्हणाले, ऑनलाइन शाळा या सॉफ्टवेअर मध्ये व्हिडिओ सादरीकरण व ब्रॉडकास्टिंगची सुविधा देण्यात आली आहे. शिक्षकांना आपल्या लॉगिनवर अभ्यासाचे नियोजन करून प्रसारित केलेला लेसन किती विद्यार्थ्यांनी अटेंड केला याचा अहवाल देता येतो. डिजिटल लायब्ररीचा मध्ये शिक्षकांनी ब्रॉडकास्ट केलेल्या लेसन संदर्भात दिलेले विविध डिजिटल लर्निंग रिसोर्सेस विद्यार्थी लॉगिनला ऍक्सेस करता येतात. असाइनमेंट, क्विजवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या रिस्पॉन्सचे रिपोर्ट्स ऐड्मिन लॉगिनवर पाहता येतात. 

माजी शिक्षण सभापती अमरीश घाटगे म्हणाले, डिजिटल क्लासरूम ही संकल्पना घेऊन जिल्हाभर अभियान राबवले होते. संपूर्ण जिल्ह्यातून या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. मंत्री.श्री. मुश्रीफ यांच्या माध्यमातून ऑनलाइन शाळाचे सॉफ्टवेअर कार्यरत होणार असून याद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने विद्यादानाचे काम करू शकतील.

◆ चार हजार विद्यार्थ्यांना मोबाईल व 33 शाळांना अँड्रॉइड टीव्ही देणार

डिजिटल क्लासरूम या संकल्पनेत संपूर्ण महाराष्ट्रात कागल अव्वल असून गटशिक्षणाधिकारी श्री. कमळकर यांच्या मागणीप्रमाणे 33 शाळांना ताबडतोब अँड्रॉइड टीव्ही तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसलेल्या चार हजार विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा यावेळी केली.

माजी शिक्षण सभापती अमरीश घाटगे म्हणाले,
विरोधकांचाही चांगल्या कामाला नेहमीच पाठबळ देणाऱ्या हसन मुश्रीफांसारखे ग्रामविकास मंत्री लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य असून त्यांच्या हातून अभूतपूर्व असे काम यापुढच्या काळात होणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांच्या बाबतीत होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या दूरगामी निर्णयामुळे महाराष्ट्रभरातील शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी सभापती विश्वास कुराडे, उपसभापती दीपक सोनार, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, सौ. शिवानी भोसले गट शिक्षण अधिकारी जीबी कमळकर यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments