सिन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एनवेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याने अनपेक्षित पणे शिवसेनेला राजकीय धक्का बसला आहे.
काल सिन्नरचे उपनगराध्यक्ष गोविंद कोंबडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर ऑनलाईन पद्धतीने निवडणूक पार पडली. सिन्नर नगरपालिकेत एकूण २९ नगरसेवक असून भाजपचे कोकाटे समर्थक १० नगरसेवक असून सत्ताधारी शिवसेनेचे अपक्ष धरून १९ नगरसेवक आहे.
त्यानुसार शिवसेनेने उपनागराध्य पदासाठी अपक्ष असलेल्या प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेतील अंतर्गत खदखद वाढल्याने सेनेच्या ५ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला.
शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांनी निवडणुकीपूर्वी १९ नगरसेवकांना व्हाट्सएप आणि विडिओ कॉन्फरन्स द्वारे अधिकृत व्हीप बजावला होता. मात्र अचानक सेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्कात येऊन शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अधिकृत कोकाटे समर्थकांनी उगले यांना मतदान केल्याने सेनेच्या अधिकृत उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे.
दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असली तरीही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील नेत्यांचं राजकीय वैर कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि सेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात गेल्या १० वर्षापेक्षा जास्त काळापासून असलेला राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांना सत्ता सांभाळता येत नसून नगरपालिकेच्या कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार आहे शिवाय भ्रष्टाचार वाढला आहे. ठराविक नगरसेवक इतर नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याने सेनेच्या ५ नगरसेवकांची नाराजी होती. ते स्वतःहून माझ्याकडे आले होते. आम्ही शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणल्याने महाविकास आघाडीचा धर्म आम्हीच पाळल्याच आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले
0 Comments