सोलापुरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचाराविना महिलेचा मृत्यू
मला क्वारंटाईन सेंटरमध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय. डॉक्टर बघत नाहीत, गोळ्या-औषधं देत नाहीत. मला इथून घेऊन जा, नाहीतर मारून टाक... असा टाहो आईने आपल्या मुलासमोर फोडला. मुलगा खाली डॉक्टर, अॅम्ब्युलन्स शोधायला गेला. तोपर्यंत आईने प्राण सोडला...
महापालिकेच्या वालचंद महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये बुधवारी सकाळी रेणुका नल्ला या महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला. रेणुका यांचे पुत्र लक्ष्मण यांनी घडला प्रकार कथन केला. ते म्हणाले, आईला तीन दिवसांपासून श्वास घेताना दम लागायचा. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगले जेवण मिळत नाही म्हणून मी घरातून जेवण आणून द्यायचो. येथील डॉक्टर काजल कोडिटकर यांना आईच्या प्रकृतीबद्दल सांगायचो तर त्या व्यायाम करायला सांगा.
दोन-तीन दिवसांत कमी होईल म्हणून सांगायच्या. बुधवारी सकाळी आठ वाजता मी चहा द्यायला आलो तर आईला फारच त्रास होत होता. डॉक्टर कोडिटकर यांना फोन केला तर त्यांनी दहा वाजता आल्यानंतर बघू, असे सांगितले. खाली थांबलेल्या वॉचमनने तर मी तुम्हाला फारशी मदत करू शकत नाही, असे सांगितले. आमची मदत करायला महापालिकेचा एकही कर्मचारी, अधिकारी नव्हता.
0 Comments